आरमोरी–वडसा मार्गावरील ‘ते’ खड्डे देतात अपघाताला आमंत्रण

53

आरमोरी–वडसा मार्गावरील ‘ते’ खड्डे देतात अपघाताला आमंत्रण
The गडविश्व
ता. प्र / आरमोरी, दि. १२ : आरमोरी ते वडसा या वर्दळीच्या मार्गावर महाकाली मंदिराजवळील वळणावर पडलेले मोठे खड्डे वाहनचालकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहेत. विशेषतः या वळणावरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे.
आरमोरीकडून वडसाकडे जाताना महाकाली मंदिराच्या पूर्वी असलेल्या वळणावर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहने या मार्गाने नियमितपणे धावत असतात. मात्र खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक वाहनचालकांना आपली बाजू बदलून वाहन चालवावे लागत आहे. परिणामी समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः ट्रक व इतर अवजड वाहनचालक खड्डे टाळण्यासाठी रस्त्याच्या विरुद्ध बाजूने मार्ग काढताना दिसतात. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी किरकोळ अपघात झाल्याच्या घटनाही घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
शासन रस्ते अपघात टाळण्यासाठी विविध मोहिमा राबवत असताना प्रत्यक्ष रस्त्यांवरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन खड्डे बुजवावेत व भविष्यातील संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here