The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २२ : तालुक्यातील घाटी गावातील रखडलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेविरोधात संतप्त गावकऱ्यांनी आज कुरखेडा-कढोली मार्गावर चक्काजाम आंदोलन करत प्रशासनाला जागं केलं. गेल्या अडीच वर्षांपासून ही योजना रखडल्यामुळे नागरिकांना भीषण पाणटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र, स्थानिक आमदार रामदास मसराम आणि शिवसेना (उबाठा) नेते सूरेंद्रसिंह चंदेल यांच्या मध्यस्थीमुळे आंदोलन शांततेत मागे घेण्यात आलं. प्रशासनाने येत्या १५ मेपर्यंत काम पूर्ण करण्याची लेखी हमी दिली आहे.
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे योजना रखडली होती. यापूर्वी गावकऱ्यांनी अनेक निवेदने, आंदोलने केली, तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर आज रस्ते अडवून संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलनस्थळी आमदार मसराम व चंदेल यांनी भेट देऊन ग्रामस्थांसोबत चर्चा केली. त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना फटकारले आणि तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश दिले.
या वेळी उपविभागीय अभियंता एस. एम. देविकर, कनिष्ठ अभियंता सोनाली येवले, नायब तहसीलदार राजकुमार धनबाते, ठाणेदार महेंद्र वाघ, तसेच विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरपंच मोहिनी गायकवाड व उपसरपंच फाल्गुण फुले यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतली.
गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, १५ मेपर्यंत काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यामुळे प्रशासनाच्या वचनबद्धतेची खरी कसोटी आता लागणार आहे.
या यशस्वी आंदोलनामुळे घाटी ग्रामस्थांना लवकरच शुद्ध पाण्याचा दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
