धानोरा तालुक्यात स्थानिकांसाठी ‘सहज व पारदर्शक’ वाळू उपलब्धीचा राज्यातील पहिला उपक्रम सुरू
– घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत, तर सर्वसामान्यांसाठी फक्त ६०० प्रति ब्रास
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. ४ : स्थानिकांना वाळू मिळवण्यासाठी त्रास न होता, कायदेशीर आणि पारदर्शक मार्गानेच बांधकाम सुलभ व्हावे, यासाठी धानोरा तालुका प्रशासनाने एक क्रांतिकारक उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाअंतर्गत लिलावाव्यतिरिक्त राखीव ठेवण्यात आलेले वाळूघाट आता केवळ स्थानिक नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत. या अभिनव कल्पनेमुळे धानोरा तालुका हा गडचिरोली जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पहिला तालुका ठरला आहे, ज्याने स्थानिक वापरासाठी स्वतंत्र वाळूघाट सुरू केले आहेत.
या योजनेमुळे नागरिकांना आता फक्त ६०० प्रति ब्रास या परवडणाऱ्या दरात वाळू उपलब्ध होणार आहे. तसेच शासनाच्या ‘घरकुल’ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ ब्रास वाळू मोफत देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे रेती तस्करीला आळा बसेल, महसूल वाढेल आणि बांधकामासाठी आवश्यक असलेली वाळू आता गावागावात सहज मिळणार आहे.
हा अभिनव उपक्रम आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार गणेश माळी यांच्या पुढाकारातून साकारला आहे. या योजनेमुळे स्थानिक विकासाला चालना मिळेल, शासकीय प्रकल्प वेळेत पूर्ण होतील आणि नागरिकांना वाळू मिळवण्यासाठी अन्यत्र धावाधाव करावी लागणार नाही.
तालुका प्रशासनाने वाळू वितरणासाठी पारदर्शक, नियोजनबद्ध आणि काटेकोर पद्धत अवलंबली असून, नागरिकांनी या लोकहितकारी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoaranews














