अल्फा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी यांनी साधला संवाद

271

– उद्योजकता निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
The गडविश्व
गडचिरोली, २४ ऑगस्ट : स्थानिक गोंडवाना विद्यापीठात सुरु असलेल्या अल्फा अकॅडमी येथील विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी अल्फा अकॅडमी येथील कामाचा आणि अभ्यासक्रमाचा आढावा घेत विद्यार्थ्यांकडून अल्फा अकॅडमीचे अभिप्राय घेतले व या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उद्योजकता निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केल्या जाणार आहे यामुळे आता अल्फा अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणातून रोजगार मिळण्यासही सोयीस्कर होणार असून जिल्हा प्रशासनाचा यात मोलाचा वाटा असणार आहे.
अल्फा अकॅडमीच्या अभ्यासक्रमातून नोकरी व उद्योजकता वाढीस लावून येथील आदिवासी समाजाचा आर्थिक स्तर वाढविणे बदलत्या काळात फक्त पारंपारिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुखकर करण्यास पुरेसे नाही त्यामुळे डिजिटल कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्यामुळे विद्यार्थ्यांना इतर कौशल्ये आत्मसात केल्याने निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ०९ जानेवारी २०२३ ला अल्फा अकॅडमी ची स्थापना गोंडवाना विद्यापीठाच्या इमारतीमध्ये करण्यात आली आहे. सद्या अल्फा अकॅडमी येथे १० बॅच चालू असून त्या मध्ये ५०० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहे.
अल्फा अकॅडमीमध्ये फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट या कोर्स मध्ये एचटीएमएल, सीएसएस, जेएस, रिॲक्ट जेएस आणि सॉफ्ट स्किल ट्रेनिंग हे अभ्यासक्रमात शिकविण्यात येत आहे. सदर अभ्यासक्रम पूर्णतः निःशुल्क असून याचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. त्या नंतर नॉसकॉम सर्टिफिकेट परीक्षा घेऊन तीन महिन्यांसाठी इंटर्नशिप (एकूण ९ महिने) आणि त्या नंतर मोठ्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळणार आहे. यात विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट प्रोग्रामिंग भाषा आणि मास्टर ट्रेनर तयार करण्यासाठी लर्नकोच ची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांमधील मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षित केल्या नंतर आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या प्रशिक्षण संस्था उघडण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार असून अनुषंगाने अल्फा अकॅडमी येथील सर्वोत्कृष्ट ५० विद्यार्थ्यांशी आज जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी संवाद साधला.
फूल स्टॅक वेब डेव्हलपमेंट या कोर्स च्या माध्यमातून फ्रिलांसिंग, पैसे कमवण्याचा मार्ग उपलब्ध होतात तसेच उद्योग उभारून इतरांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात अशा विविध विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
यावेळी कार्यक्रमाला नियाज मुलाणी, प्रकल्प व्यवस्थापक, जिल्हा परिवर्तन समिती,गडचिरोली, लर्नकोच चे संस्थापक मनीष तिवारी, अल्फा अकॅडमी चे स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here