– संतप्त नागरिक रस्त्यावर, पोलिस-प्रशासनावर आरोप
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : शहराच्या मध्यभागी असलेल्या मुख्य इंदिरा गांधी चौकात रविवारी संध्याकाळी घडलेल्या भीषण अपघाताने गडचिरोली पुन्हा हादरले. सुरजागड येथून लोहखनिज घेऊन जाणाऱ्या ट्रकने (MH 34 BG 7135) एका युवकाला चिरडून ठार केले. या धक्कादायक घटनेनंतर शहरात संतप्त नागरिकांचा उद्रेक झाला आणि वाहतुकीची संपूर्ण व्यवस्था कोलमडली.
ही दुर्घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. मृत युवकाचा मृत्यू घटनास्थळीच झाला असून, बातमी लिहेपर्यंत त्याची ओळख पटू शकलेली नव्हती. अपघात घडताच ट्रकचालक पळून गेला, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अपघातानंतर नागरिकांनी मृतदेह उठवण्यास स्पष्ट नकार दिला. “सुरजागड खनिज प्रकल्पाचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नाही,” अशी ठाम भूमिका घेत आंदोलकांनी चौकात ठिय्या दिला होता. काही वेळातच शेकडो नागरिकांनी चौकात गर्दी केली. परिस्थिती इतकी चिघळली की पोलिसांना तातडीने मोठा बंदोबस्त आणावा लागला.
दरम्यान, एका सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधीने “जाऊ द्या, जाऊ द्या” असा गलथान व अपमानजनक सूर लावत संतप्त नागरिकांच्या भावना अजून भडकवल्या. परिणामी, दोन स्थानिक प्रतिनिधींमध्ये वाद निर्माण झाला व तणाव वाढला होता. यावेळी जमावाकडून ट्रक पेटवण्याच्या धमक्याही दिल्या जात होत्या.
या गंभीर वातावरणात अखेर बंदुकधारी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या हस्तक्षेपाने गर्दी पांगवण्यात यश आले. ट्रक पोलिस ठाण्यात हलवण्यात आला. मात्र तोपर्यंत शहरातील चारही मार्गांवर वाहतूक ठप्प झाली होती. शहराच्या मुख्य रस्त्यांवर खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकांची व इतर वाहनांची रांग लागली होती.
अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे, याच चौकात अवघ्या ४- ५ तासांपूर्वी दुसरा अपघात घडला होता. दुपारच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने एका नागरिकाला उडवल्याने तो गंभीर जखमी झाला होता.
या दोन अपघातांमुळे संपूर्ण गडचिरोली शहरात भीती आणि असंतोषाचे वातावरण आहे. “दररोज या लोहखनिजाच्या ट्रकांचे उन्मत्तपणे धावणे, पोलिसांचे डोळेझाक करणं, आणि अपघात घडल्यानंतरही कोणतीही कठोर कारवाई न होणं हे स्पष्टपणे सांगतं की यामागे पोलिस यंत्रणेचे अप्रत्यक्ष संरक्षण आहे,” असा ठपका अनेक नागरिकांनी या दरम्यान दबक्या आवाजात लावला होता.
सुरजागडच्या लोहखनिज वाहतुकीने गेल्या काही वर्षांत अनेकांचे बळी घेतले आहेत. तरीही ना वाहतूक नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात, ना ट्रकचालकांवर कठोर कारवाई केली जाते. आजच्या अपघाताने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर शिक्कामोर्तब झाले असून, येत्या काळात नागरिकांचा संयम सुटल्यास काय होईल, याची झलक आजच्या संतप्त प्रतिक्रिया आणि रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी दाखवून दिली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #accident #surjagad #truckaccident )