– भेंडाळा येथील लाडक्या बहिणींच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना महाविकास आघाडीवर जोरदार टीका
The गडविश्व
चामोर्शी, दि. २६ : महायुतीच्या सरकारने राज्यातील भगिनींसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीचे नेते बंद पाडण्याच्या प्रयत्नात असून त्यांचा हा डाव महायुती कधीही यशस्वी होऊ देणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या पैशावर डल्ला मारू पाहणाऱ्या महाविकास आघाडीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगलाच धडा शिकवा असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी भेंडाळा येथील लाडक्या बहीण योजनेच्या मेळाव्या प्रसंगी केले.यावेळी मंचावर भाजपा जिल्हा महामंत्री सौ. योगिता पिपरे, सरपंच कुंदाताई जुवारे, गडचिरोली शहर महीला आघाडीच्या अध्यक्ष कविता उरकुडे, नंदाताई मोगरे, सुषमा नांदगीरवार, संगीता बुरे, गीताताई वाडगुरे, अल्काताई सातपुते, लक्ष्मी ताई डांगे प्रामुख्याने उपस्थित होते.
मेळाव्याला मार्गदर्शन करताना आमदार डॉ. होळी म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या लाडक्या बहिणीसाठी मातृ भगिनींसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. महिलांना बस प्रवासामध्ये ५० टक्के सवलत ,मुलींना शिक्षणात १०० टक्के सवलत तर लाडक्या बहिणींना प्रतिमाह १५०० रुपये देऊन मदत करण्याचा प्रयत्न केला आहे असे अनेक क्रांतिकारक निर्णय महायुतीच्या सरकारने घेतले आहे परंतु हे सर्व बंद पाडण्याचा डाव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रचलेला आहे . त्यामुळे त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना योग्य धडा शिकवावा असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी या मेळाव्याप्रसंगी उपस्थित लाडक्या बहिणींना केले.
