तळेगाव–कुरखेडा रस्ता वर्षभरापासून खड्ड्यांत ; नागरिक हैराण
– सार्वजनिक बांधकाम विभाग सांगतो निधी नाही
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. ०३ : तालुक्यातील तळेगाव–कुरखेडा हा प्रमुख ग्रामीण मार्ग गेल्या एका वर्षापासून अक्षरशः खड्ड्यांच्या तावडीत सापडला आहे. दुरुस्तीचे काम सुरू करण्याऐवजी रस्त्यावर मोठमोठे बोल्डर टाकून तो बंदिस्त करण्यात आल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. शेकडो शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांना या मार्गाचा दररोज वापर करावा लागतो; परंतु आजवर कामाला ‘मुहूर्तमेढ’ लागत नाही.
आमच्या प्रतिनिधीने सार्वजनिक बांधकाम विभागाशी (PWD) संपर्क साधला असता, “निधी उपलब्ध नसल्याने काम सुरू होऊ शकले नाही,” असे बेफिकीर उत्तर मिळाले. विभागाच्या या भूमिकेमुळे कुरखेडा तालुक्यातील १५ पेक्षा अधिक गावांचा दुवा असणारा हा महत्त्वाचा मार्ग रखडला असून नागरिकांचे हाल वाढले आहेत. हा रस्ता कुरखेडा–देसाईगंज मुख्य मार्गाशी जोडणारा महत्वाचा संपर्कमार्ग मानला जातो.
दरम्यान स्थानिक युवकांनी आम्ही आमदार, खासदार, जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत तक्रार करणार आहोत. जर १५ दिवसांत काम सुरू झाले नाही तर आम्ही रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करू,असा प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.
दरम्यान तळेगाव–कुरखेडा रस्ता ‘निधी नाही’ या कारणात अडकलेला असून, नागरिक मात्र रोज जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करण्यास मजबूर आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews














