अगा भावा, खरा धर्म कोणता गा ?

267

स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिवस विशेष

_भारत सरकारने सन १९८५मध्ये १२ जानेवारी या दिवसाला राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करायचे ठरवले. या दिवसाला असे काय महत्व आहे? तर या दिवशी स्वामी विवेकानंद यांची पावन जयंती असते. ”उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही” हा संदेश स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना दिला. श्रीकृष्णदास (बापू) निरंकारीजीं यांच्या लेखणीतून जाणा उद्बोधक माहिती… संपादक._

भारतावर व जगावर स्वामी विवेकानंदांचा प्रभाव दिसून येतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नेहरूंचे पीए एम.ओ.मथाई यांना म्हणाले होते की, “अलिकडच्या शतकात भारताने निर्माण केलेला सर्वात मोठा माणूस म्हणजे विवेकानंद आहेत, गांधी नव्हे.” नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते, “जोपर्यंत बंगालचा संबंध आहे, आम्ही विवेकानंदांना आधुनिक राष्ट्रीय चळवळीचे आध्यात्मिक पिता म्हणू शकतो.” स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा प्रभाव तत्कालीन समाजावर व त्यांच्या अनुयायांवर दोन वेगवेगळ्या प्रकारे पडला. काही विषय, व्यक्ती आणि प्रसंग यांवर त्यांनी कडाडून तोफ डागली. तर काही बाबतीत वाऱ्याच्या मंद झुळकीने फुलाची पाकळी जशी हळुवारपणे उमलते तसा त्यांचा प्रभाव होता. मानवी जीवनावर स्वामीजींच्या एकूण झालेल्या प्रभावाची अशी वर्गवारी करता येईल- त्यांनी वेदान्ताकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. निस्वार्थी मानवसेवा हाच खरा धर्म होय, असे त्यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केले. भारतातील राष्ट्रीय, आध्यात्मिक चळवळी व इतर सामाजिक सेवाकार्ये या सगळ्यांच्या मागे प्रत्यक्षाप्रत्यक्षरीत्या स्वामीजींची प्रेरणा होती व आहे. पाश्चिमात्य जगात त्यांनी भारताचे आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील दूत म्हणून भूमिका बजावली.
स्वामी विवेकानंद हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यास त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. उत्तर कोलकत्ता सिमलापल्ली येथे दि.१२ जानेवारी १८६३ रोजी म्हणजेच पौष कृष्ण सप्तमी, संक्रांतीच्या दिवशी विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात वकीलाचे अ‍ॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथांच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा अनमोल वाटा होता. नरेंद्रनाथांना दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवतगीता आदि धार्मिक साहित्यात त्यांनी विशेष आवड दाखवली. त्यांना शास्त्रीय संगीताची देखील जाण होती. त्यांनी बेनी गुप्ता व अहमद खान या उस्तादांकडून गायन-वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच ते व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव त्यांच्या वैधतेसंबंधी त्यांनी लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते. सारासार विचार व व्यवहारी दृष्टिकोन यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता. विवेकानंद हे मित्र परिवारात प्रिय होते. त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने तर त्यांचे गुरू नोरेन या शब्दाने हाक मारत. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठियुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते. गुरूदेव रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण स्वामी विवेकानंद असे केले. राजा अजितसिंग खेत्री यांनीही दि.१० मे १८९३ रोजी त्यांना विवेकानंद हेच नाव दिले.
स्वामी विवेकानंद म्हणजे योद्धा, संन्यासी, आणि तरुण पिढीचे अखंड प्रेरणास्रोत, ज्यांनी फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातल्या युवा पिढीसमोर आदर्श ठेवला. सगळे देश भारताकडे मोठ्या आशेने बघत आहेत. का? तर भारत एक संधीचा देश आहे. या देशात अनेक संधी आज वाट बघत आहेत. जग भारताकडे आशेने बघत आहे. कारण आज आपला देश सर्वात तरुण देश आहे. ज्या देशाची ६५ टक्के लोकसंख्या तरुण असेल, ३५ वर्षांच्या आतली असेल, तो देश किती भाग्यवान आहे! आमच्याकडे आज कोटी कोटी युवा जनता आहे. जिथे ही तरुणाई असते, तिथे संकल्पांना काही सीमा नसतात, बंधने नसतात. कधी कधी आपल्या देशात युवकांच्या वेगवेगळ्या व्याख्या ऐकायला मिळतात. शास्त्रापासून आजपर्यंत तरुणाईच्या अनेक व्याख्या झाल्या आहेत. प्रत्येकाचा आपापला दृष्टीकोन असतो. अनेकांना वय हेच तारुण्याची ओळख आहे, असे वाटते. युवापिढी म्हणजे नव्या विचारांची आणि आधुनिकतेची सांगड घालून आपले म्हणणे समाजापुढे मांडणारी नव्या जोशाची पिढी आहे. खरे पाहता आपल्याला विविध प्रकारच्या क्षेत्रात चांगले यश पादाक्रांत करण्याची सुवर्ण संधी आणि पुरेसा वेळ आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी तरुणांची संख्या अधिक आहे. तरूण म्हणजे प्रचंड उत्साह, काहीतरी करून दाखवण्याची धडपड होय. तरुण म्हणजे प्रचंड जोश, तरुण म्हणजे अफाट इच्छाशक्ती… अशी कितीतरी विशेषण तरुणांना लागू पडतात. जगात तरुणांची संख्या अधिक आहे, त्यामुळे विविध तंत्रज्ञानात तरुणांची भरारी विलक्षणीय आहे. कधी तरुणाईचे पाऊल भलत्याच दिशेने पडताना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे व्यसनाधीनता, चंगळवाद, सोशल मिडीयाचा अतिरेक आदी आहेत. ही तरुणपिढीला लागलेली वाळवी आहे. कुठल्याही देशाची प्रगती ही तिथल्या तरुणांवर अवलंबून असते त्यामुळे आपल्या देशाला भक्कम आधार आपण तरुणच देऊ शकतो, हे प्रत्येकाने ध्यानात घेणे गरजेचे आहे. विशेषतः भारताचे सरासरी वय हे २८ आहे. त्यामुळे भारत जगातील सर्वात तरुण देश ठरतो. युवा वर्गाने स्व:ताला टेक्नॉलॉजीशी इतके सुसंगत ठेवले आहे, की ते जगाशी ओळख ठेवून आहेत. कुठे काय घडतेय हे त्यांना माहीत असते. पण याच टेक्नॉलॉजीशी ते इतके भावनिक गुंतले गेले आहेत, की त्यामुळे तिथूनच त्यांना नैराश्यही येते.
स्वामी विवेकानंदजींनी दि.४ जुलै १९०२ रोजी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधीच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरून त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना रात्री त्यांनी समाधी घेतली. चाळीस वर्षापर्यंत आपण जगणार नाही, ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. खरच आपणच आपले भविष्य घडवायला हवे. कोणावरही अवलंबून राहणे, हे योग्य नाहीच!
!!स्वामी विवेकानंदजींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व चिरतरुण भारताला राष्ट्रीय युवा दिवसाच्या प्रेरणादायी हार्दिक शुभेच्छा !!

श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.
(वैभवशाली भारतातील थोर पुरुषांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक व विश्लेषक.)
द्वारा- प. पू. गुरूदेव हरदेव कृपानिवास.
मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.
पो. ता. जि. गडचिरोली (पिन- ४४२६०५).
फक्त व्हा. नं. ७४१४९८३३३९.
इमेल- krishnadas.nirankari@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here