सुरजागड यात्रेत लोह खाणी विरोधात असंतोषाची ठिणगी

441

– ठाकूरदेव देवस्थान परिसरात लाॅयड मेटल्स कंपनीने केलेल्या हस्तक्षेपावर ग्रामसभा आक्रमक
The गडविश्व
एट्टापल्ली, दि. ०८ : सुरजागड येथील पारंपरिक ठाकूरदेव यात्रा स्थळी लोह खदान कंपनी लाॅयड मेटल्सने इलाख्यातील ग्रामसभा आणि पारंपरिक प्रमुखांना कोणतीही विचारणा न करता सभामंडप, भोजनदान स्टाल, गोटूल स्थळी शौचालय आणि ठिकठिकाणी बॅनरबाजी केल्याबद्दल इलाख्यातील अनेक पारंपरिक प्रमुखांनी आक्षेप घेवून कंपनी विरोधात तीव्र रोष व्यक्त केला. यामुळे पुन्हा एकदा लोहखाणीचा विषय ऐरणीवर आला आहे.
यात्रेच्या शेवटच्या दिवशी इलाख्यातील सर्व ७० गावांच्या पारंपरिक प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत सुरजागड इलाख्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात येवून ठराव करण्यात आले. सुरजागड लोह खाणीचे विस्तारीकरण व त्यासंबंधाने २८ जानेवारी रोजी होणाऱ्या जनसूनावणी विरोधात सर्व स्तरावर आंदोलन, पाठपुरावा करणे, वनहक्का अंतर्गत इलाखा दावा मान्यता, शिक्षण, आरोग्य, शेती आणि पारंपरिक प्रथा, परंपरा, नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी इलाख्याच्या वतीने सातत्याने संघर्ष करण्यात येईल असा महत्त्वपूर्ण ठरावही या चर्चेदरम्यान पारीत करण्यात आला.
दरम्यान यावर्षीच्या यात्रेदरम्यान लाॅयड मेटल्स कंपनीने देवस्थानच्या मालकी हक्काच्या जागेत केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा रोष व्यक्त करुन कंपनीने यापूर्वी प्रशासनाचा धाक दाखवून आमच्या विरोधानंतरही खदान खोदली आणि आता आमच्या पारंपरिक प्रथा, परंपरा आणि देवाधर्माच्या कार्यात ढवळाढवळ करु पाहत असल्याचा आरोप करून सदर कंपनी विरोधात तीव्र आंदोलन, न्यायालयीन संघर्ष करण्याचा संकल्प करण्यात आला.
या समारोपीय बैठकीला सुरजागड इलाखा प्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा, शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ. डॉ. महेश कोपूलवार, जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राज्याध्यक्ष काॅ. वैभव चोपकार, भंडारा जिल्हाध्यक्ष रवि बावणे, कामगार नेते काॅ. विनोद झोडगे, आम आदमी पक्षाचे चंद्रपूर युवक जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, माजी पं.स.सदस्य शिलाताई गोटा, जयश्रीताई जराते, सुरजागडच्या सरपंच करुणा सडमेक, माजी सरपंच कल्पना आलाम, अर्चना मारकवार, कविता ठाकरे, भाई शामसुंदर उराडे, भाई रमेश चौखुंडे, युवक नेते भाई अक्षय कोसनकर, भाकपचे तालुका सचिव काॅ. सचिन मोतकूरवार, सुरज जक्कूलवार, रमेश कवडो, कन्ना गोटा यांच्यासह शेकडो पारंपरिक प्रमुख आणि ग्रामसभांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here