– झाडे व विद्युत तारा कोसळल्याने चातगाव मार्गावरील जनजीवन विस्कळीत
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ११ : तालुक्यात १० जून रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास आलेल्या अचानक वादळ, वाऱ्याच्या झोतासह पावसामुळे धानोरा तालुक्यात मोठे नुकसान झाले. गारपीटीसह आलेल्या या वादळामुळे विद्युत पुरवठा पूर्णतः खंडित झाला असून, मागील २४ तासांपासून परिसर अंधारात आहे.
वादळामुळे घरांचे छप्पर उडाले, विद्युत खांब व तारा तुटून जमिनीवर पडल्या. चातगाव मार्गे गडचिरोलीकडून होणारा विद्युत पुरवठा या मार्गावर अनेक ठिकाणी झाडे पडल्याने थांबलेला आहे. विद्युत यंत्रणा कोसळल्याने पुरवठा पूर्ववत होण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.
याशिवाय, अनेक मुख्य मार्गांवर झाडे व तारा कोसळल्याने वाहतूकही पूर्णतः ठप्प झाली होती. धानोरा तालुका–मुरुम गाव रस्ता, रांगडी मार्ग आणि चातगावकडील रस्त्यावर झाडे कोसळल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.
प्रशासनाकडून विद्युत यंत्रणा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
