– सुदैवाने जीवितहानी टळली
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ११ : धानोरा तालुक्यातील हेटी गावात १० जून रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास आलेल्या अचानक वादळ व जोरदार पावसाने मोठे नुकसान घडवले. मुखरू श्रीराम मुंडले यांच्या घरावर चिंचेचे मोठे झाड कोसळले. या अपघातात त्यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सिमेंटच्या पत्र्यांना तडे गेले व घराच्या भिंतींना भेगा पडल्या.
विशेष म्हणजे, झाड इतके मोठे होते की त्याच्या फांद्या थेट घरात शिरल्या. त्या वेळी मुखरू यांची पत्नी सुरेखा आणि मुलगा रोहित घरातच होते. अचानक काही तरी पडत असल्याची जाणीव झाल्याने दोघेही वेळीच बाजूला झाले आणि मोठी जीवितहानी टळली.
दरम्यान, केवळ आठवड्याभरापूर्वी मुखरू मुंडले यांचा मुलगा रोहित याने घेतलेली नवीन पल्सर बाईकही या झाडाखाली दबून अक्षरशः चकणाचूर झाली. शिवाय, झाड कोसळल्यामुळे त्या भागातील विद्युत तारा तुटून अस्ताव्यस्त पडल्या आहेत.
मुखरू मुंडले यांनी प्रशासनाकडे नुकसानग्रस्त घराचे आणि दुचाकीचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
