विविध मागण्यांकरीता वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघातर्फे निवेदन

246

– बंद केलेल्या गाड्या पुन्हा सुरू करा ; नवीन सुपरफास्ट एक्सप्रेसना वरोऱ्याला थांबा द्या
The गडविश्व
चंद्रपूर, ६ जून : कोरोना काळात बंद केलेल्या पॅसेंजर व सुपर एक्सप्रेस गाड्या पुन्हा सुरू कराव्या आणि वरोरा रेल्वे स्थानकावर नवीन एक्सप्रेस गाड्यांचा थांबा द्यावा, या मागणीसह मध्य रेल्वे नागपूर मंडळ अंतर्गत येणाऱ्या नागपूर – बल्लारशाह मार्गावरील रेल्वे स्थानकावर आवश्यक सुविधा प्राधान्याने उपलब्ध कराव्या अशा विविध मागण्यांचे निवेदन वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने व सचिव जितेंद्र चोरडिया यांच्या नेतृत्वात केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर, चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर जोरगेवार, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी व वरोरा उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांना देण्यात आले.
निवेदनात, वरोरा रेल्वे स्थानकावर १२७९१/९२ सिकंदराबाद पटना एक्सप्रेस,१२६१५/१६ जी.टी. एक्सप्रेस,२२६४५/४६ अहिल्यानगरी एक्सप्रेस, १२९७५/७६ जयपूर एक्सप्रेस,१२५११/१२ गोरखपूर एक्सप्रेस, १२९९५/९६ संघमित्रा एक्सप्रेस , ११०४५/४६ धनबाद – कोल्हापूर एक्सप्रेस, १२७६७/६८ संतरागांची सुपरफास्ट व अन्य सुपर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा. कोरोना संक्रमणच्या लॉक डाऊन काळात बंद केलेल्या ( नंदीग्राम एक्सप्रेस, जयंती जनता एक्सप्रेस, आनंदवन एक्सप्रेस, पॅसेजर गाडी, बल्लारशाह – मुंबई सेवाग्राम लिंक एक्सप्रेस ) गाड्या पुन्हा सुरू कराव्यात, बल्लारशाह वरुन वर्धा – अमरावती – नागपूर साठी फास्ट लोकल चालविण्यात यावी. बल्लारशाह वरुन मुंबई / पुणे साठी प्रतिदिनी २२/२४ डब्ब्याची सुपर एक्सप्रेस चालविण्यात यावी. बल्लारशाह रेल्वे स्थानकावरुन हावडासाठी नवीन गाडी सुरू करावी, नागपूर – जबलपूर एक्सप्रेसचा विस्तार बल्लारशाह रेल्वे स्थानकापर्यंत करावा. सर्व पॅसेंजर गाडया पूर्ववत सुरू कराव्यात, वरोरा रेल्वे स्थानकाच्या मागील (पश्चिम) बाजूस नवीन तिकीट बुकींग कार्यालय सुरू करणे, वरोरा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर डिस्प्ले बोर्ड व कोच पोजिशनसाठी इंडिकेटर लावण्यात यावे, वरोरा रेल्वे स्थानकावर नव्याने दुसरा एफओबी ( फुट ओवर ब्रीज) बनविण्यात यावा, वरोरा रेल्वे स्थानकावर स्वयंचलित पायऱ्या व लिफ्टची व्यवस्था करण्यात यावी. सिनिअर सिटीझनसाठी रेल्वे भाड्यात सूट सोबतच त्यांचा आरक्षण कोटा पूर्ववत करणे इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना दररोज भेडसावणाऱ्या अडीअडचणींचा पाढा वाचीत यातील प्रत्येक मागणी कशी रास्त आहे व त्याची अंमलबजावणी करणे कसे गरजेचे आहे शिवाय शासकीय तिजोरीत निधीची अतिरिक्त भर कशी पडेल, हे राजेंद्र मर्दाने व जितेंद्र चोरडिया यांनी नेटके विवेचन करीत मान्यवर मंडळींना पटवून दिले.
या मागण्यांचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकारी व केंद्रीय रेल्वे केबिनेट मंत्री यांना पाठवून त्याच्या पूर्ततेसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन मान्यवरांनी दिले. यावेळी प्रवासी संघाचे उपाध्यक्ष प्रवीण गंधारे, संघटक राहुल देवडे, सदस्य माजी प्राचार्य बी.आर. शेलवटकर, खेमचंद नेरकर, प्रवीण सुराणा, जगदीश तोटावार, विलास दारापूरकर, बंडू देऊळकर, शाहिद अख्तर, कॅरन्स रामपूरे, डॉ. प्रवीण मुधोळकर, बबलू रॉय आदी उपस्थित होते.
(the gdv, the gadvishva, chandrpur, warora, bhadravati)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here