`स्टोरीटेल`ची सहा वर्षे ; मोबाईलच्या माध्यमातून पुस्तकांशी नातं जोडणारा प्रयोग

144

The गडविश्व
मनोरंजनविश्व / मुंबई, दि.०६ : जगातील आघाडीचा ऑडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म स्टोरीटेल भारतात येऊन ६ वर्षे पूर्ण झाली. मोबाईलच्या माध्यमातून पुस्तकांशी नातं जोडणारा हा प्रयोग रसिकांना अत्यंत भावला. विशेषतः मराठीजनांमध्ये त्याची लोकप्रियता विशेष आहे. सातव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांच्याशी यानिमित्ताने साधलेला हा संवाद.
प्रश्न- `स्टोरीटेल`चे भारतात सातव्या वर्षात पदार्पण झाले आहे. मागे वळून पाहता, काय वाटते?
उत्तर- २७ नोव्हेंबर २०१७ रोजी आम्ही भारतात दाखल झालो तेव्हा आमच्याकडे भारतीय भाषांतील अगदी कमी पुस्तके होती. तसेच तेव्हा वर्गणी भरुन पुस्तक ऐकणे, ही संकल्पनाच आपल्याकडे तशी नवी होती. मात्र, आमच्यावर विश्वास ठेऊन पुस्तकांवर प्रेम करणारे लाखो वाचक श्रोते म्हणून आमच्याशी जोडले गेले. दरवर्षी आमच्याकडील पुस्तकांच्या संग्रहात मोठी वाढ होत गेली, तसतसा प्रतिसादही वाढत गेला. स्टोरीटेलच्या निमित्ताने भारतातील ऑडिओ बुक इंडस्ट्रीदेखील आकारास येत गेली. त्यातून विविध प्लॅटफॉर्मही आकारास आले आणि आजतागायत सुमारे दहा लाखांहून अधिक रसिक या माध्यमाशी संलग्न झाले. मला वाटते, भारतात श्राव्य पुस्तकांचे स्टेबल मार्केट आज दिसते आहे, त्यात `स्टोरीटेल` मोठी भूमिका बजाऊ शकले, याचा मला विशेष आनंद आहे.
प्रश्न- स्टोरीटेल सुरु झाले तेव्हाचे मुख्य आव्हान कुठले होते आणि त्यावर तुम्ही मात कशी केली?
उत्तर- स्टोरीटेलची सुरवात झाली तेव्हा आपल्याकडे पुस्तके ऐकण्याची, विशेषतः पैसे भरुन ऐकण्याची सवय नव्हती. त्यामुळे वर्गणीदार वाचक-श्रोता तयार करणे हे मुख्य आव्हान होते. सुदैवाने आमच्याकडील सर्वोत्तम असा पुस्तकसंग्रह, युजर एक्सपेरिन्स यामुळे सशुल्क ऐकणाऱ्यांचा वर्ग आम्ही तयार करु शकलो. याशिवाय, आम्ही अनेक प्रकाशकांनाही त्यांची पुस्तके स्टोरीटेलवर आणण्याची संधी दिली. त्याचाही फायदा झाला. आम्ही तरुणाईला कनेक्ट करु शकलो. आज, आमच्याकडे केवळ मराठीपुरते बोलायचे झाले तरी तब्बल ५००० हून अधिक पुस्तके आहेत. आमची शेकडो ओरिजनल्स, तसेच पॉडकास्ट लोकप्रिय आहेत. स्टोरीटेल कट्टा हा आमचा पॉडकास्ट मराठीत सर्वाधिक ऐकला जाणारा पॉडकास्ट असून त्याचे ३०० भाग प्रसारित झाले आहेत. सहाशेहून अधिक पब्लिशर्स, लेखक, नॅरेटर्स असा आमचा परिवार बहरला आहे. २७ नोव्हेंबर रोजी आम्ही लोकप्रिय लेखक सुहास शिरवाळकर यांचे अस्तित्व ही कादंबरी मुद्रित स्वरुपात येण्याआधी आम्ही श्राव्य स्वरुपात प्रकाशित करतो आहोत, हे यानिमित्ताने आवर्जून नमूद करावेसे वाटते.
प्रश्न- स्टोरीटेलची आगामी वाटचाल कशी असेल?
उत्तर- मागच्या वर्षी रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाले, तेव्हापासून `स्टोरीटेल`चे जागतिक प्राधान्यक्रम बदलले आहेत. त्यामुळे अन्य देशांपेक्षा युरोपकेंद्री धोरण सध्या अवलंबण्यात आले आहे. त्यामुळे मागच्या वर्षी आम्ही पूर्वीसारखी गुंतवणूक करु शकलो नाही. मात्र, भविष्यात धोरण बदलताच ही परिस्थिती बदलू शकते. त्याबाबतीत आम्ही सकारात्मक आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here