धक्कादायक! धावत्या बसला भीषण आग, २० प्रवाशांचा करुण अंत
– पहाटेच्या सुमारास महामार्गावरभीषण अपघात
The गडविश्व
कुरनूल (आंध्र प्रदेश), दि. २४ : हैदराबादहून बंगळुरूकडे निघालेल्या व्हॉल्वो बसला आज पहाटे सुमारे ३.३० ते ५ वाजताच्या सुमारास कुरनूल जिल्ह्यात महामार्गावर भीषण अपघात झाला. धावत्या बसने दुचाकीला धडक दिल्यानंतर काही क्षणांतच बसला आग लागली आणि काही मिनिटांत संपूर्ण बस ज्वाळांनी वेढली गेली. या हृदयद्रावक दुर्घटनेत २० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ३:३० वाजता कुरनूल जिल्ह्यातील चिन्नाटेकूर गावाजवळ, कल्लूर मंडळातील एनएच-४४ महामार्गावर हा अपघात घडला. कावेरी ट्रॅव्हल्सची व्हॉल्वो एसी बस (हैदराबाद–बंगळुरू मार्गावर) धावत असताना तिच्या मागे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. दुचाकी बसखाली अडकली आणि इंधन टाकीला ठिणगी पडल्याने क्षणात आग भडकली असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान “धडकेनंतर काही सेकंदातच बस पेटली. एसी बस असल्याने दरवाजे आणि खिडक्या लगेच उघडता आल्या नाहीत. ज्या प्रवाशांनी काच फोडली तेच बचावले. बसमध्ये एकूण ४० प्रवासी आणि दोन चालक होते. त्यापैकी १५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. https://x.com/Hyderabad_Mail/status/1981527933354389847?s=19
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग नियंत्रणात आणल्यानंतर बस पूर्णतः जळून खाक झालेली आढळली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या भीषण दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना सरकारी मदतीचं आश्वासन दिलं आहे.
“कुरनूलजवळ झालेल्या या दुर्घटनेने मी अत्यंत व्यथित झालो आहे. सर्व पीडित कुटुंबांना शासनाच्या वतीने पूर्ण मदत केली जाईल,” असे त्यांनी सोशल मीडियावरून म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपी प्रमुख वाई. एस. जगन मोहन रेड्डी यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले — “ही दुर्घटना अत्यंत दुःखद असून, ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांना मनःपूर्वक संवेदना.”
या अपघातामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात असून, महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident #KurnoolBusFire #AndhraPradeshAccident #VolvoBusTragedy #NH44Crash #GadchiroliNews














