सावली : किरकोळ वादातून युवकाची भरचौकात हत्या

13

– परिसरात दहशत, चार आरोपींना अटक
The गडविश्व
सावली, दि. १५ : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात मानकापूर हेटी (केरोडा) गावात एका किरकोळ वादातून थेट रक्तरंजित खुनाचा थरार घडला. मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास आंबेडकर चौकात समीर हरीदास खंडारे (वय ३२) या तरुणावर चार जणांनी मिळून धारदार चाकूने वार करत निर्घृणपणे खून केला. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, समीर खंडारे याचा गिरीधर वालदे (५०) व त्याचा मुलगा अभय वालदे (२३) यांच्याशी किरकोळ वाद झाला होता. मात्र, वाद विकोपाला गेल्यानंतर अभयने आपल्या दोन अल्पवयीन मित्रांना व्याहाड खुर्द येथून बोलावले. चौघांनी मिळून समीरवर धारदार शस्त्रांनी हल्ला करत त्याला नितेश नैताम यांच्या पाणठेल्यासमोर मृत अवस्थेत फेकून दिले. भरचौकात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून गावकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाची लाट पसरली. समीरच्या भावाने तात्काळ पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपींच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे चारही आरोपींना रातोरात अटक करण्यात आली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

(#thegdv #thegadvishva #crimenews)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here