गडचिरोली जिल्ह्यात 144 कलम लागू

322

The गडविश्व
गडचिरोली, १५ ऑगस्ट : महसूल विभागातील, गट- क संवर्गातील, तलाठी पदभरती परीक्षा-2023 चे अनुषंगाने, TCS कंपनी यांचेकडून परीक्षेचे पुढीलप्रमाणे वेळापत्रक प्राप्त झालेले आहे. परिक्षेचा दिनांक 17,18,19,20,21,22,26,27,28,29,31 ऑगस्ट 2023 व 1,4,5,6,8,10,13,14 सप्टेंबर 2023 तर परिक्षेची वेळ सत्र क्रमांक 1-सकाळी 9.00 वा. ते सकाळी 11.00 वा. सत्र क्रमांक 2- दुपारी 12.30 वा. ते दुपारी 2.30 वा., सत्र क्रमांक 3- दुपारी 4.30 वा. ते सायं.06.30 वा.
त्याअनुषंगाने, उपरोक्त दिनांकास व वेळेत गडचिरोली येथील शासकीय तंत्रनिकेतन, गडचिरोली (Government Polytechnic Gadchiroli) येथे परिक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत, परिक्षा कालावधीत विवक्षीत कृती करण्यापासून परावृत्त करणे तसेच शांतता तथा सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने, सदर परीक्षा केंद्रावर उक्त दिनांकास व वेळेत सकाळी 8.00 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यत पोलीस कर्मचारी तैनात ठेवणे आवश्यक आहे.
जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांना फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन परिक्षा केंद्राच्या 100 मिटरच्या परिसरात पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येत आहे.
परिक्षा उपकेंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती परीक्षार्थी व परिक्षेसी संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाही. परिक्षा केंद्राचे परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. 100 मिटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, सायबर कॅफे, झेरॉक्स सेंटर, फॅक्स केंद्र, पानपट्टी, टायपिंग सेंटर, एस टी डी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे परिक्षा सुरु होण्यापुर्वी दोन तास व परीक्षा सुरु असण्याचा संपुर्ण कालावधीत बंद राहतील. परिक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस/वाहनास प्रवेशास मनाई राहील. परिक्षा केंद्राचे परिसरात परिक्षेच्या कालावधीत ध्वनी प्रदुषणामुळे परिक्षार्थिंना त्रास होईल असे कृत्य करु नये.
सदर आदेश परिक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी, परिक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी/कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेबाबत त्याचे परिक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागु राहणार नाही. तसेच हे आदेश उक्त परीक्षा केंद्रावर, परिक्षेच्या दिनांकास व वेळेत सकाळी 8.00 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यत लागू राहतील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here