विदर्भ वगळता राज्यातील शाळा आजपासून सुरू

422

– उन्हाच्या तीव्रतेने विदर्भातील शाळा ३० जून पासून
The गडविश्व
मुंबई, १५ जून : महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक वर्षाला गुरूवार १५ जून २०२३ पासून सुरूवात होत आहे. विदर्भ वगळता राज्यातील शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. विदर्भातील उन्हाची तीव्रता लक्षात घेता येथील शाळा ३० जून पासून सुरू होणार आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यापूर्वीच सांगितले होते.
दरम्यान शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज असून विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षण घेऊन यशस्वी व्हावे, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा देताना मंत्री केसरकर म्हणाले, विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व आहेत. त्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात आले असून एकाच पुस्तकामध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. याच पुस्तकात नोंदी घेण्यासाठी वह्यांची पाने देण्यात आली आहेत. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, सॉक्स देण्यात येणार आहेत. शेतीचे ज्ञान आवश्यक असल्याने यापुढे शेती विषय शिकविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोणतेही काम करण्यात कमीपणा नसतो हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी श्रमाची महती समजून घ्यावी आणि  माणुसकी जपावी असा सल्लाही केसरकर यांनी दिला. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा आणि महाराष्ट्रासह देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा. जगातील सर्वात तरूण देश म्हणून जगाला उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करावा. या कामी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शासन विद्यार्थ्यांच्या सोबत असून जगाचे दूत म्हणून सेवा देण्यासाठी तयार व्हावे, असेही केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले.

(the gdv, ,the gadvishva, gadchiroli, vidarbh, school start 15 jun)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here