एकता दिवसानिमित्त ‘रन फॉर युनिटी’ – गडचिरोली पोलीस दलातर्फे मॅरेथॉनचे आयोजन
– जिल्हाभरातून १०,५४० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग, विजेत्यांना देण्यात आली पारितोषिके
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३१ : भारतीय एकतेचे शिल्पकार आणि देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने ‘रन फॉर युनिटी – मॅरेथॉन’ स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी ६ वाजता पोलिस कवायत मैदान, गडचिरोली येथून कारगिल चौकापर्यंत ही मॅरेथॉन पार पडली. यावेळी नीलोत्पल यांनी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ केला.
गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस मुख्यालय, उपमुख्यालय प्राणहिता तसेच सर्व पोस्टे, उपपोस्टे व पोमके स्तरावर एकाच वेळी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉनमध्ये जिल्हाभरातून तब्बल १०,५४० स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. पोलिस अधिकारी, अंमलदार, विद्यार्थी, युवक-युवती, तसेच ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा संदेश देणारे बॅनर, झेंडे आणि घोषवाक्यांसह जोशपूर्ण धाव घेतली. मॅरेथॉनचा समारोप शहिद पांडु आलाम सभागृह येथे झाला. यावेळी पोलिस बँड पथकाने राष्ट्रभक्तीपर धून वाजवून स्पर्धकांचे मनोबल वाढविले.
विजेत्या स्पर्धकांना पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५,०००, ३,००० आणि २,००० रुपयांची रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. सहभागी वरिष्ठ अधिकारी आणि इतर स्पर्धकांनाही प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, “या मॅरेथॉनचा उद्देश केवळ धावणे नसून जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भावना दृढ करणे आहे. गडचिरोलीत सशक्त, एकसंघ आणि देशप्रेमी पिढी घडत आहे, हे अभिमानास्पद आहे,” असे त्यांनी सांगितले.
मॅरेथॉन स्पर्धेनंतर सर्व सहभागींना अल्पोपहार देण्यात आला. त्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकारी, पोलिस अधिकारी, अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय एकता शपथ घेण्यात आली. तसेच सर्व पोस्टे, उपपोस्टे व पोमके स्तरावर निबंध स्पर्धांचे आयोजन करून एकता दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे पो.उप.नि. चंद्रकांत शेळके तसेच सर्व शाखांचे अधिकारी आणि अंमलदार यांनी परिश्रम घेतले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #RunForUnity #EktaDiwas #GadchiroliPolice #SardarPatel150 #UnityMarathon














