गडचिरोलीकरांसाठी दिलासा : वर्षातील १५ दिवस ध्वनीक्षेपक वापरास मध्यरात्रीपर्यंत परवानगी

37

गडचिरोलीकरांसाठी दिलासा : वर्षातील १५ दिवस ध्वनीक्षेपक वापरास मध्यरात्रीपर्यंत परवानगी
– शिवजयंती ते ३१ डिसेंबरपर्यंत विविध सण-उत्सवांसाठी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सशर्त सुट
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात वर्षातील ठरावीक १५ दिवस ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सशर्त परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ मधील तरतुदीनुसार राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केलेल्या अधिकारांतर्गत ही सुट जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याशी सल्लामसलत करून २०२६ या वर्षाकरिता सकाळी ६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांना नियमानुसार परवानगीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मध्यरात्रीपर्यंत परवानगी असलेले दिवस पुढीलप्रमाणे :

शिवजयंती – १९ फेब्रुवारी २०२६

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – १४ एप्रिल २०२६

ईद-ए-मिलाद – २६ ऑगस्ट २०२६

गणेश उत्सव – २०, २३, २४ व २५ सप्टेंबर २०२६

नवरात्र उत्सव – १९, २०, २१ व २२ ऑक्टोबर २०२६

दिवाळी लक्ष्मीपूजन – ८ नोव्हेंबर २०२६

ख्रिसमस – २५ डिसेंबर २०२६

३१ डिसेंबर २०२६

ही परवानगी श्रोत्यगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंदिस्त जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी लागू राहील. मात्र, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० तसेच सुधारित नियम २०१७ मधील सर्व अटी व मर्यादांचे काटेकोर पालन करणे आयोजकांना बंधनकारक राहील. तसेच मा. उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्र. १७३/२०१० मध्ये १६ ऑगस्ट २०१६ रोजी दिलेल्या आदेशांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
राज्य शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात ही सवलत लागू राहणार नसून निश्चित ध्वनी मर्यादा व अटींचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिला आहे.
सण-उत्सवांचा उत्साह अबाधित ठेवत पर्यावरणीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here