– जिल्हाधिकाऱ्यांचे त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली दि.१० : जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि शासनाकडे त्यांचा अद्ययावत डाटाबेस उपलब्ध रहावा, यासाठी विशेष पोर्टल अद्ययावत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या. दिव्यांगांच्या नोंदणीसाठी https://zpgadchirolidivyangsathi.com/ हे पोर्टल सुरू करण्यात आले असून, आतापर्यंत ग्रामीण भागातील ६ हजार दिव्यांगांनी यावर नोंदणी पूर्ण केली आहे. शहरी भागातील दिव्यांग्य व्यक्तींनी यावर नोंदणी करावी.
शासनाकडून जिल्ह्यातील ११ हजार १३६ दिव्यांगांना युडीआयडी (Unique Disability ID) देण्यात आले आहे. मात्र, अद्यापही काही दिव्यांग व्यक्तींनी नोंदणी केलेली नाही. अशा व्यक्तींनी तसेच युडीआयडी प्राप्त मात्र अद्याप नोंदणी न केलेल्या दिव्यांग व्यक्तिंनीही यावर लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
दिव्यांग कल्याण समितीच्या आढावा बैठकीत या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष गाडे, समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज तसेच विविध विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ सहज मिळावा, जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारण्यात यावे, तसेच घरकुल योजनेंतर्गत दिव्यांगांना प्राधान्याने मंजुरी द्यावी, यासंबंधीही बैठकीत चर्चा करण्यात आली.

दिव्यांग व्यक्तींनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि अधिकृत डाटाबेसमध्ये आपला समावेश करून घेण्यासाठी https://zpgadchirolidivyangsathi.com/ या पोर्टलवर स्वतः किंवा जवळच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.