– आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०७ : नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताच विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. मात्र, या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांच्या जातीच्या नोंदीबाबत अचूकता राखावी, अन्यथा भविष्यात शैक्षणिक दस्तऐवजांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने दिला आहे. यासंदर्भात गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
हे निवेदन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व परिषदचे जिल्हाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शनात सादर करण्यात आले. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, जिल्ह्यात काही नामसदृश जातींमुळे चुकीचा जातउल्लेख होतो, परिणामी विद्यार्थ्यांना भविष्यात शासकीय लाभ घेण्यास अडथळे निर्माण होतात.
त्यामुळे, शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांनी नाव नोंदवताना विद्यार्थ्यांची मूळ जात नीट पडताळूनच तिची नोंद करावी, अशी मागणी परिषदेने केली आहे. तसेच शिक्षण विभागानेही आपले अधिनस्त अधिकारी व शाळांना यासंदर्भात स्पष्ट सूचना द्याव्यात, असे निवेदनात नमूद आहे.
या वेळी डॉ. देविदास मडावी (प्रदेश संयुक्त सचिव), सरपंच परमेश्वर गावडे, उमेश उईके, सुरज मडावी, विद्याताई दुगा, रोहिणी मसराम, माधुरी पडोटी, विलास उईके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #विद्यार्थीप्रवेश #जातनोंदणी #आदिवासीविकासपरिषद #गडचिरोली