आदिवासी संस्कृतीचे जतन करीत दारूबंदीचे समर्थन करणारे गाव पुसेर

134

दारू व खर्रामुक्त गाव म्हणून ओळख
The गडविश्व
गडचिरोली,दि. ०८ : आदिवासी संस्कृतीमध्ये धार्मिक ते विविध कार्यांसाठी दारूचा वापर करावा लागतो, ही आदिवासी लोकांची समज आहे. परंतु, चामोर्शी तालुक्यातील पुसेर या गावात धार्मिक असो वा लग्न, मरण अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमाला दारूचा वापर न करता आदिवासी संस्कृतीचे जतन केले जात आहे. सलग आठ ते दहा वर्षांपासून दारू व खर्रामुक्त गाव म्हणून ओळख मिळवणाऱ्या या गावात विजयस्तंभ सुद्धा उभारण्यात आले आहे.
पुसेर हे गाव तालुक्याच्या सीमेवर व तालुक्यापासून ५० किमी अंतरावर असलेले घनदाट जंगलात वसलेले गाव आहे. या ठिकाणी जाण्यास चार वर्षांपूर्वी रस्ता सुद्धा नव्हता. अशा गावात सर्व गावकऱ्यांच्या पुढाकाराने रस्ता तयार करण्यात आला. या गावात कोणतेही काम एकमताने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाते. ‘आमच्या गावात आम्ही सरकार’ या म्हणी प्रमाणे या गावाची वाटचाल सुरु आहे. सदर गाव आठ-दहा वर्षांपासून दारू व खर्रामुक्त गाव आहे. या ठिकाणी कोणी बाहेरील सुद्धा खर्रा खाऊन पन्नी फेकल्यास १०० रुपये दंड आहे. दारू खऱ्याचे वापर केल्यास १००० रुपये दंड आकारले जाते.
या छोट्या गावात बाहेरील लोकांसाठी राहण्यास, आराम करण्यास समाज मंदिर ची व्यवस्था आहे. या ठिकाणी बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके, आदिवासींच्या दैवतांचे पुतळे सुद्धा आहेत. असा हा निसर्गरम्य वातावरणात वसलेला गाव आहे. या ठिकाणी फक्त आदिवासी लोक राहतात. आदिवासी लोक देवपूजेसाठी दारूचा उपयोग करतात. मरण, लग्न व इतर कोणत्याही कार्यक्रमाला दारू लागते. अशी समज आहे. परंतु या ठिकाणी सर्व गाव दारू बंदीचे समर्थन करीत आहे. शिवाय गावात कोणीही दारू, खर्रा खात नाही. सन २०२३ मध्ये गावात मुक्तिपथ तालुका उपसंघटक आनंद सिडाम यांच्या मार्गदर्शनाखाली दारू, खर्रा विक्रीमुक्त गाव म्हणून विजयस्तंभ सुद्धा लावलेला आहे. आजही सदर गाव दारू, खर्रा विक्रीमुक्त गाव म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहे. सदर गावचे पोलिस पाटील केसरी मट्टामी यांच्या पुढाकाराने गावात वेगवेगळ्या योजनांचा लाभ गावाला प्राप्त होत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath #chamorshi )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here