उद्या कुरखेडा येथे बिरसा मुंडा वर आधारित जनजागृति कार्यक्रम

907

– राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा उपक्रम
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने), दि.०२ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई अंतर्गत आदिवासी जमातीतील स्वातंत्र्य योद्धांच्या गाथाची माहिती जनसामान्यांना व्हावी याकरीता “धरती आबा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा” या क्रांती नाटकाचे मोफत आयोजन उद्या शुक्रवार ३ नोव्हेंबर रोजी गांधी चौक, कुरखेडा येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ सर्व सामान्यानी घ्यावा असे आवाहन आज गूरूवार रोजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत लोकजागृती स्वयं सेवी संस्था चंद्रपूर येथील पदाधिकाऱ्यांनी केले आहे.उद्या शुक्रवारी सांयकाळी ६ ते १० या कालावधीत आयोजित या कार्यक्रमात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सूधीर मुनगंटीवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम, खा.अशोक नेते, आ.कृष्णा गजबे, आ.डॉ. देवराव होळी, पद्मश्री डॉ. परशूराम खूणे उपस्थीत राहणार आहेत. आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा, विर बाबूराव शेडमाके, विर उमाजी नाईक, वासूदेव फडके, तंट्या भिल्ल यांची क्रांतीगाथा सर्व सामान्यांपर्यंत पोहचत आदिवासी समाजात चेतणा निर्माण व्हावी याकरीता शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून झाडीपट्टी रंगभूमीचे लेखक चूडाराम बल्लारपूरे लिखीत व अनिरुद्ध वनकर दिग्दर्शित ‘धरती आबा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा’ या क्रांतीनाट्याचे प्रयोग शासनाकडून लोकजागृती स्वय सेवी संस्था चंद्रपूर यांच्या मार्फत राज्यात ठिकठिकाणी करण्यात येणार आहे व याचा पहिलाच प्रयोग कुरखेडा येथे आयोजित करण्यात आला असुन नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन लोकजागृती संस्थेचे प्रतिनिधि संजीव रामटेके, कल्याणी खोब्रागडे, नयणा खोब्रागडे व करिश्मा मेश्राम यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here