The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात एकलव्य निवासी शाळांमध्ये इयत्ता ६ वी वर्गात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या व इयत्ता ७ वी ते ९ वीचे वर्गातील रिक्त जागांसाठी रविवार २५ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रवेशपूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
इयत्ता ६ वी करीता सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत तसेच इयत्ता ७ वी ते ९ वी करीता सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत परिक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता ६ वी ते ९ वीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. सदरची यादी परीक्षा केंद्रनिहाय लावण्यात आलेली आहे. प्रवेशपूर्व परीक्षा गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, आरमोरी या तालुक्यातील शाळांसाठी शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली या परीक्षा केंद्रावर तसेच वडसा, कुरखेडा, कोरची आरमोरी या तालुक्यातील शाळांसाठी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, सोनसरी या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सुरक्षितपणे आणण्याची जबाबदारी संबंधित आश्रमशाळा, जि. प. अनुदानित व इतर शाळांच्या मुख्याध्यापक/शिक्षकांची आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी ९ वाजता हजर राहावे असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुल कुमार मीना यांनी केले आहे.