– अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद गडचिरोली यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून मागणी
The गडविश्व
गडचिरोली, ६ मे : एकलव्य रेसिडेंसीअल मॉडेल स्कुल, चामोर्शी/गेवर्धा, गडचिरोली येथिल अकुशल कामगारांचे नियुक्ती आदेश देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद गडचिरोली यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा, गडचिरोली, एकलव्य रेसिडेंसीअल मॉडेल स्कुल चामोर्शी/गेवर्धा स्थित गडचिरोली असे एकुण तीन शाळेची पटसंख्या ९०६ आहे. विद्यार्थ्याच्या भोजनाची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी, नाशिक या संस्थेकडून एकलव्य रेसिडेंसीअल मॉडेल स्कुल चामोर्शी/ गेवर्धा येथील विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेकरीता विद्यार्थी संख्येनुसार बाह्यस्त्रोताद्वारे स्वयंपाकी कामाठी या पदावर रोजंदारी तत्वावर अकुशल कामगाराची नेमणूक करण्यात आली आहे. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांच्या आदेशातील सरनामा क्र.११ नुसार शा. इंग्रजी माध्य. आश्रम शाळा गडचिरोली येथील भोजन व्यवस्थेकरीता ०१ जानेवारी २०२३ ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत कामाठी, स्वयंपाकी या पदावर काम करण्यास मदत करतील अशा प्रकारे आदेश दिलेले आहे. परंतु रेकचंद व्ही. दुधे, छाया एच. कोडापे, अल्का पी. गुरनुले, कल्पना पी.उमे हे २० ऑगस्ट २०२२ पासून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत अकुशल कामगार हे मुख्याध्यापक/अधिक्षकांच्या सूचनेनुसार रात्री-बेरात्री काम केलेले आहे. इतकेच नव्हे तर रात्रीला आजारी विद्यार्थ्यांसोबत दवाखान्यात राहून २४ तास सेवा केली असताना सुद्धा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांनी नियुक्ती आदेश दिलेले नाही. सबंधित आदेशाबाबत विचारणा केली असता प्रकल्प अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना उडवा- उडविचे उत्तर दिलेले आहे असाही आरोप केला आहे.
२० ऑगस्ट २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ असे एकुण पाच महिन्याचे नियुक्त आदेश दिले नसल्यामुळे गरीब, अकुशल कर्मचाऱ्यावरती उपासमारीची वेळ आलेली असून त्यामुळे गरीब रोजंदारी अकुशल कामगाऱ्यांच्या नियुक्ती आदेशाबाबत आपण आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
यावेळी आदिवासी विकास परिषद युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, रुपेश सलामे, अकुशल कामगार रेकचंद दुधे, छाया कोडापे, अल्का गुरनुले उपस्थित होते.