– सुदैवाने जीवितहानी टळली; घराचे नुकसान
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०९ : धानोरा शहरातील विद्यानगर प्रभागात ८ जूनच्या रात्री विजेचा एक धक्का बसवणारा प्रकार घडला. सायंकाळी साडेआठच्या सुमारास कोणतेही वादळ, वारा किंवा पावसाचा अत्तरसुद्धा नसताना, प्रशांत कोडाप यांच्या घरावर अचानक वीज कोसळली. या घटनेत त्यांच्या घरावरील रेलिंगचा काही भाग पूर्णपणे कोसळला असून घराचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सविस्तर माहिती अशी की, रात्रीच्या वेळेस आकाशात ढगाळ वातावरण होते मात्र वीजेची कोणतीही शक्यता वाटत नव्हती. अचानक आकाशात प्रचंड गडगडाटासह वीज कोसळली आणि क्षणात कोडाप यांच्या घरावरील लोखंडी रेलिंगवर ती आदळली. या आवाजाने परिसरात क्षणिक घबराट निर्माण झाली. विजेचा जोर एवढा जबरदस्त होता की आजूबाजूच्या परिसरातील कचरा, माती व दगड उडून दूर फेकले गेले.
घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. मात्र रेलिंगचे तुकडे रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
या अपघातामुळे धानोरा शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वीजप्रकोपाबाबत हवामान खात्याने कोणतीही पूर्वसूचना दिलेली नसताना असा प्रकार घडल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक प्रशासन व वीज वितरण कंपनीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून नुकसानग्रस्त कुटुंबाला मदतीची मागणी नागरिकांकडून होत आहे.
