The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : राज्यात काही भागांमध्ये खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील कृषी विभागाने खत विक्रेत्यांवर कडक नजर ठेवायला सुरुवात केली आहे. कुरखेडा, वडसा, चामोर्शी तसेच इतर तालुक्यांमध्ये खत विक्रेत्यांची तपासणी सुरू असून, आधार लिंक केल्याशिवाय खत विक्री करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी दिली आहे.
कृषी विभागाच्या तपासणीत अनेक ठिकाणी पीओएस (पॉइंट ऑफ सेल) मशीनचा वापर न करता खत विक्री करण्यात आल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे पीओएसवरील नोंद आणि प्रत्यक्ष साठ्यात मोठी तफावत आढळली आहे. या प्रकरणी काही खत विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सध्या खत साठा, विक्री, इन्व्हेंटरी रेकॉर्ड आणि पीओएस प्रणाली यांची बारकाईने तपासणी सुरू आहे. कुठेही अनियमितता आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
२०१७ पासून अनुदानित खत विक्रीसाठी आधार लिंक करणे आणि पीओएस मशीनचा वापर बंधनकारक करण्यात आलेला असतानाही अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्व खत विक्रेत्यांना “आधार लिंक असेल तरच विक्री” या धोरणाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना आपले आधार कार्ड सोबत ठेवणे अनिवार्य आहे. आधार लिंक केल्याशिवाय त्यांना खत मिळणार नाही, अशी स्पष्ट सूचना कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
खत वितरण व्यवस्था पारदर्शक ठेवण्यासाठी कृषी विभागाची ही मोहीम सुरू असून, नियमभंग करणाऱ्यांवर परवाने रद्द करण्यापर्यंतची कठोर कारवाई होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #FertilizerRegulation #AadhaarLinkMandatory #AgricultureDepartment #GadchiroliNews #FertilizerDistribution #AadhaarBasedSale #POSMachineUse #FarmerAwareness #FertilizerShortage #SubsidizedFertilizer #AadhaarForFertilizer #AgriculturalReform #FertilizerInspection #FertilizerBlackMarketing #FarmerSupport
