आदिवासी भागात आरोग्याचे नवे मॉडेल : मुख्यमंत्र्यांच्या पथदर्शी प्रकल्पामुळे आरोग्यसेवा थेट जंगलात
The गडविश्व
गडचिरोली/मुंबई, दि. ३१ : गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आरोग्य सेवेचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्वयंसेवी संस्था ‘सर्च’ (सोसायटी फॉर एज्युकेशन, ॲक्शन अँड रिसर्च) यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी व्यापक मोहीम राबवली जात असून, यामुळे आदिवासी भागात आरोग्याचे एक नवे मॉडेल आकार घेत आहे. आता या दुर्गम भागात मोबाईल मेडिकल युनिट थेट जंगलात पोहोचत आहे.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही राज्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध नाविन्यपूर्ण योजना राबवल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोलीत आरोग्यसेवा थेट जनतेच्या दारात पोहोचत आहे.
मोबाईल हॉस्पिटल थेट जंगलात
पूर्वी ज्या दुर्गम भागांपर्यंत पारंपरिक आरोग्यसेवा पोहोचू शकली नव्हती, त्या भागांमध्ये आता शासनाचे ‘मोबाईल मेडिकल युनिट’ नियमित धाव घेत आहे. एकेकाळी देशातील अतीमागास आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा धानोरा तालुका या उपक्रमामुळे आरोग्य सुविधांनी सज्ज होत आहे. धानोरा तालुक्यातील ७० गावांतील आदिवासी नागरिकांना आता त्यांच्या दारातच डॉक्टरांकडून तपासणी, औषधे आणि उपचार मिळत आहेत. मोफत आरोग्यसेवेच्या या मोहिमेमुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि विश्वासाचे हास्य झळकत आहे.
या उपक्रमातून आरोग्य विभाग, आशा सेविका आणि सर्च संस्थेच्या सहकार्याने आदिवासी भागासाठी एक प्रभावी व टिकाऊ आरोग्य मॉडेल उभे राहिले आहे.
‘आशा’ सेविकांना नवसंजीवनी
‘सर्च’ संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागात कार्यरत १८१ आशा सेविकांना वर्षातून तीन वेळा तज्ज्ञांकडून विशेष प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामुळे आशा सेविका आता नव्या आत्मविश्वासाने व उत्साहाने कार्य करत असून, आरोग्यसेवेचा पाया अधिक मजबूत होत आहे.
अधिकारी ते आशा – सर्वांसाठी संयुक्त प्रशिक्षण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकताच एक अभिनव करार करण्यात आला आहे. याद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी ‘सर्च’ संस्थेत दोन दिवसांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेणार आहेत. यामध्ये वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि आशा सेविका या सर्वांना एकत्र बसवून संयुक्त प्रशिक्षण दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील ही पहिलीच क्रांतिकारी पद्धत ठरली असून, ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेच्या त्रिस्तरीय बळकटीकरणासाठी हे पथदर्शी उदाहरण ठरत आहे.
आदिवासीनुरूप आरोग्यसेवा – भविष्याचा आराखडा
भविष्यात या भागात आदिवासी संस्कृतीनुरूप आरोग्यसेवा विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. आदिवासी जीवनशैली, पारंपरिक औषधोपचार आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांचा समन्वय साधून स्थानिक गरजांना पूरक अशी आरोग्य प्रणाली उभी केली जाणार आहे.
गडचिरोलीच्या जंगलात सुरू झालेली ही आरोग्य चळवळ म्हणजे केवळ सेवा नव्हे, तर “आरोग्य क्रांतीची नवी पहाट” ठरत आहे. मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीकोनातून राबविण्यात येणारा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या आरोग्य नकाशावर गडचिरोलीला नवे स्थान देईल, असा विश्वास आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #AarogyaModel #GadchiroliHealthReform #TribalHealthcare #MobileHospital #SearchGadchiroli #CMDevendraFadnavis














