गडचिरोलीत दिव्यांगांसाठी रोजगाराची नवी दारं उघडली

31

– तुळशी दिव्यांग संघटनेच्या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
The गडविश्व
गडचिरोली, दि.१२ : तुळशी दिव्यांग संघटना, तालुका गडचिरोलीच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी *रोजगार, स्वयंरोजगार आणि संघटना बांधणी मार्गदर्शन मेळावा* पुल्लेसुर वीर बाबुराव शेडमाके सभागृह, पंचायत समिती गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात पार पडला. १०२ दिव्यांग सहभागी होऊन या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या प्रस्ताविकेच्या वाचनाने झाली. यानंतर उपस्थितांना त्यांचे हक्क, अधिकार व सरकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त डॉ. सतीश गोगुलवार, राष्टीय पॉलिटीव्ह केअर समन्वयक राहुल कंकनालवार, नेत्रदान समुपदेशक विजय शिडाम, अध्यक्ष राजू कुमरे, सचिव तुळशीराम पुडके, कोषाध्यक्ष वैशाली मोहुर्ले, विकलांग अधिकार समन्वयक संगीता तुमडे, ICDS विस्तार अधिकारी वरघंटे मॅडम, प्रशिक्षक मोनाली मेश्राम, पत्रकार सुरज गेडाम आणि संगती शेतकरी उत्पादक कंपनीच्या संगीता सहारे यांची उपस्थिती लाभली.
दिव्यांग व्यक्तींसाठी UDID कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना, रेल्वे सवलत पास, जाती व अधिवास प्रमाणपत्र, बचतगट निर्मिती, राखीव निधी वाटप आदी योजनांची माहिती देण्यात आली. विशेषतः १८ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींसाठी निवासी कौशल्य विकास प्रशिक्षण, रोजगार संधी, मानधन रचना आणि नोकरीचे स्थळ याविषयी माहिती देण्यात आली.
नेत्रदानाबाबत जनजागृती करताना दृष्टीदानाचे महत्त्व, डोळे दान करताना घ्यावयाची काळजी आणि नेत्रपेढीचे कार्य कसे चालते याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात ‘आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेच्या २००१ पासून सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये संघटनेचे कार्य सुरु असून दिव्यांग व्यक्तींच्या नेतृत्व विकासापासून ते व्यवसाय विस्तार, पुनर्वसनापर्यंत अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
संघटनेच्या माध्यमातून स्थापन झालेल्या ‘संगती शेतकरी उत्पादक कंपनी’मधून ८७५ भागधारक शेळीपालन, कुकुटपालन, वराहपालन, गौण वनउपज खरेदी-विक्रीसारख्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत आहेत. या उपक्रमांमुळे दिव्यांग व्यक्तींना आर्थिक स्थैर्य व सामाजिक ओळख प्राप्त होत आहे.
कार्यक्रमाचे संचालन राजकुमार गायमुखे यांनी, प्रस्तावना नीता राऊत यांनी केली आणि आभार प्रदर्शन अध्यक्ष राजू कुमरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैशाली मोहुर्ले, जयश्री बारसिंगे, अमोल व इतर सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
हा मेळावा केवळ माहितीपर नव्हे तर प्रेरणादायी ठरला असून, दिव्यांग बांधवांना स्वावलंबनाची नवी दिशा देणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here