The गडविश्व
वाशिम, दि. १० : जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील सोमठाणा गावात ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा संतापजनक प्रकार घडला आहे. गेल्या २० वर्षांपासून स्मशानभूमीच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी (०९ जुलै) गावातील मृत व्यक्तीचा मृतदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन ठेवल्याने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं.
गावात स्मशानभूमी नसल्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणे कठीण झाले असून, सततच्या पावसामुळे मोकळी जागा मिळणं अवघड झालं आहे. गावकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. यामुळे संतप्त नागरिकांनी आक्रोश करत आंदोलन छेडलं.
गावात दोन स्मशानभूमी कागदोपत्री दाखवण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्यांचा काही उपयोग नाही. ही बाब वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतरही प्रशासनाने पाठ फिरवल्यामुळेच गावकऱ्यांना हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मध्यस्थी करत वातावरण निवळवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, ग्रामपंचायतीने लवकरच स्मशानभूमीची जागा निश्चित करून काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेहावर अंत्यविधी करण्यात आला. मात्र, गावकऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की, ही शेवटची वेळ आहे. आता पुन्हा दुर्लक्ष झालं, तर गावकरी शांत बसणार नाहीत.

#Washim #Somthana #NoCrematorium #VillagersProtest #NegligentGovernance #RuralIndia #FuneralCrisis #DeadBodyProtest
#DemandForJustice #20YearsOfNeglect #वाशिम #स्मशानभूमीचा_प्रश्न #ग्रामपंचायतीचा_दुर्लक्ष #गावकऱ्यांचा_संताप #सोमठाणा #मृतदेह_कार्यालयात #20वर्षांची_प्रतीक्षा #लोकशक्तीचा_आवाज #ग्रामीण_वास्तव #सामाजिक_न्याय