स्वातंत्र्यानंतर प्रथमच मंगेवाडात पोहोचणारे लोकप्रतिनिधी ठरले आमदार डॉ. मिलिंद नरोटे

48

स्वातंत्र्यानंतर प्रथमच मंगेवाडात पोहोचणारे लोकप्रतिनिधी ठरले आमदार डॉ. मिलिंद नरोटे
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०७ : छत्तीसगड राज्याच्या सीमेवर वसलेल्या, घनदाट जंगलांनी वेढलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम अशा मंगेवाडा गावाच्या इतिहासात आजचा दिवस मैलाचा दगड ठरला. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांच्या कालखंडात ज्या गावात कोणत्याही लोकप्रतिनिधीचे पाऊल पडले नव्हते, त्या मंगेवाडात पहिले लोकप्रतिनिधी म्हणून आमदार डॉ. मिलिंद नरोटे प्रत्यक्ष पोहोचले. डोंगर-दऱ्या, कच्चे रस्ते आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आमदार डॉ. नरोटे मंगेवाडा जिल्हा परिषद शाळेत दाखल होताच ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी भावूक झाले. आजवर केवळ निवडणुकांच्या काळात नावे ऐकलेल्या गावकऱ्यांसाठी प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींची ही भेट आश्वासक ठरली. यावेळी आमदारांनी वर्गात बसून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. सीमावर्ती व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक अडचणी, शाळेची इमारत, पिण्याचे पाणी, शैक्षणिक साहित्य व मूलभूत सुविधांबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. विकासापासून वर्षानुवर्षे दूर राहिलेल्या मंगेवाडा परिसराचा कायापालट करण्याचा ठाम निर्धार यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी व्यक्त केला. शाळेच्या पायाभूत सुविधा मजबूत करणे, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे तसेच पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी शासनस्तरावर विशेष पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. भौगोलिक अंतर कितीही असले तरी विकासाचे अंतर आता राहणार नाही, असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला. या ऐतिहासिक भेटीवेळी भाजपा तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, तालुका महामंत्री शुभाषजी धाईत, कोषाध्यक्ष शुभाषजी खोबरे, युवा नेते श्रीनिवासजी दुलमवार, पवनजी येरमे, अविनाशजी पोरेटी आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी मिळून या अतिदुर्गम भागातील दीर्घकाळ प्रलंबित समस्या सोडवण्याचा संकल्प व्यक्त केला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच लोकप्रतिनिधींच्या पावलांनी मंगेवाडात विकासाची नांदी झाली असून, या भेटीने सीमावर्ती विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत नव्या आशेची चमक निर्माण झाली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here