-गावसंघटनेत अनेकांचा सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : देसाईगंज तालुक्यातील विवीध 9 गावांमध्ये मुक्तीपथ व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मुक्तीपथ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शेकडो लोकांनी सहभाग घेत अवैध दारूविक्री विरोधात लढा देण्यासाठी संघटनेत शामिल होण्याचा निर्णय घेतला.
दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांना कायदेशीररित्या धडा शिकविण्यासाठी गावागावात मुक्तीपथ गाव संघटना गठीत करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून गावात अवैध दारूविक्री विरोधात जागृती करणे, अहिंसक कृती करणे असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या संघटनेत गावातील युवक, युवती, महिला, पुरुषांनी सहभाग घ्यावा व आपल्या गावाला दारुतून मुक्त करावे, या उद्देशाने मुक्तीपथ व गाव संघटनेच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा घेतली जात आहे. देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव, बोडधा, कोरेगाव, फरी , उसेगाव, कोंढाळा, सावंगी, कुरुड, चोप या नऊ गावांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शेकडो महिला-पुरुष, युवक-युवतींनी सहभाग घेत अवैध दारूविक्री विरोधात एकवटण्याचा निश्चय केला.
दरम्यान, स्पर्धेचे रूपांतर सभेत करून मुक्तीपथ तालुका संघटीका भारती उपाध्ये व चमूने अवैध दारूविक्री बंद करण्याबाबत गावाची भूमिका, मुक्तीपथ गाव संघटनेचे कार्य, पोलिस विभागाकडून मिळणारे सहकार्य, व्यसन उपचार शिबीर आदी मुद्द्यांवर मार्गदर्शन करीत गाव संघटना अधिक मजबूत करण्यासाठी लोकांनी संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंत गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलिस पाटील, तंमुस अध्यक्ष व प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते स्पर्धेमध्ये यशस्वी ठरलेल्या एकूण 87 स्पर्धकांना मेडल, प्रमाणपत्र व दुप्पटा देऊन सन्मानित करण्यात आले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #muktipath )