– जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश – रुग्णवाहिका सेवा सक्षम करण्यावर भर
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : शहरातील रस्त्यांवरून बेफाम वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर आता काही प्रमाणात लगाम लागणार आहे. नगरपरिषद क्षेत्रात कमी वेगमर्यादा लागू करण्याची कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या आहेत. विशेषत: २०१८ पूर्वीच्या जड वाहनांमध्ये बसविण्यात आलेल्या वेगमर्यादा चिप्स प्रत्यक्षात कार्यरत आहेत का, याची काटेकोर तपासणी करण्याचेही आदेश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. बैठकीस अधीक्षक अभियंता निता ठाकरे, अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवडे आदी अधिकारी उपस्थित होते.
अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका सेवा सक्षम करण्यावर भर दिला. सध्या जिल्ह्यात १०८ क्रमांकावर केवळ १० रुग्णवाहिका उपलब्ध असल्याने १०२ सेवेतील आणखी ४० रुग्णवाहिका अपघातस्थळी तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रणाली विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्तीची जाणीव लहान वयापासून निर्माण व्हावी यासाठी गडचिरोली येथे ट्रॅफिक पार्क उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. बैठकीत ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’, राँग साईड, हेल्मेट व सीटबेल्ट मोहिमांचा आढावा घेण्यात आला. रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत सर्वाधिक तक्रारी राष्ट्रीय महामार्गांबाबत असल्याचे समोर आले असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासही आदेश देण्यात आले.
परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग व पोलिस विभाग यांनी समन्वयाने काम करून रस्ता सुरक्षा उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीस वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शरद मेश्राम, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #DistrictCollector #RoadSafety #AccidentPrevention #TrafficRules #TrafficPark #MunicipalCouncil #SpeedLimit
#गडचिरोली #जिल्हाधिकारी #रस्ता_सुरक्षा #अपघात_प्रतिबंध #वाहतूक_शिस्त #ट्रॅफिक_पार्क #नगरपरिषद #वेगमर्यादा














