लोकसभा निवडणूक २०२४ : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

104

– विधानसभानिहाय होणार मतमोजणीच्या फेऱ्‍या
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३१ : लोकसभा निवडणूक-2024 च्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल 2024 रोजी 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाकरिता झालेल्या मतदानाची मतमोजणी 4 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून कृषी महाविद्यालयाच्या इमारतीत सुरु होणार असून यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहे.
12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रम्हपुरी आणि चिमुर या सहा विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघाकरिता 14 टेबल याप्रमाणे सहा विधानसभा मतदारसंघाकरिता एकूण 84 टेबल लावण्यात आले आहेत. तसेच टपाली मतपत्रिकेच्या मतमोणीसाठी 12 टेबल व इलेक्ट्रॉनिकली ट्रांसमिटेड पोस्टल बैलेट सिस्टम (ईटीपीबीएस) साठी एक टेबल असे एकूण 97 टेबलवर मतमोजणी होणार आहे.

विधानसभानिहाय मतमोजणीच्या फेऱ्‍या :

66- आमगाव विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 23 फेऱ्‍या, 67- आरमोरी मतदारसंघात 22 फेऱ्‍या, 68- गडचिरोली करीता 26 फेऱ्‍या, 69- अहेरी करीता 21 फेऱ्‍या, 73-ब्रम्हपुरीकरिता 23 फेऱ्‍या आणि 74- चिमुर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 23 फेऱ्‍या राहणार आहेत. यासोबतच प्रत्येक विधानसभा मतदार संघातून सोडत पद्धतीने निवडलेल्या प्रत्येकी 5 व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यात येणार आहे.

मतमोजणीसाठी प्रत्येक मतदार संघनिहाय व प्रत्येक टेबलनिहाय मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले असून एकूण 117 मतमोजणी पर्यवेक्षक, 130 मतमोजणी सहायक, 120 सुक्ष्म निरीक्षक व इतर 101 सहायक कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रत्येक उमेदवाराला इव्हीएम मतमोजणी, इटीपीबीएस व पोस्टल बॅलेट पेपर मतमोजणीसाठी एका टेबलसाठी एक याप्रमाणे 97 प्रतिनिधी नेमता येणार आहे. त्यासाठी फॉर्म 18 भरूने आवश्यक आहे. मतमोजणी कक्षात प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधीसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणीस्थळी उमेदवारांच्या प्रतिनिधींकरिता कम्युनिकेशन कक्ष, पत्रकारांसाठी मीडिया कक्ष तसेच उमेदवारांकरिता कक्ष स्थापन केलेला असून सर्व कक्ष सुसज्ज आहेत. संपूर्ण परिसर सीसीटीव्ही नियंत्रणाखाली राहणार आहे.
वीज पुरवठा अखंड सुरु राहावा यासाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने तसेच भारतीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले दोन निवडणूक निरीक्षक, उप जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यांच्या निरीक्षणाखाली संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पडणार आहे. मतमोजणीस्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेची देखरेख आहे. यात बाह्य स्तरावर महाराष्ट्र पोलिस दल, दुसऱ्या स्तरावर राज्य राखीव पोलिस दल तर आतील स्तरावर केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत.
मतमोजणी कक्षात मोबाईल किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु, तसेच निवडणूक आयोगाने प्रतिबंध केलेल्या वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #loksabhaelection2024 #gadchirolichimur )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here