कुरखेड्याचे एकमेव सार्वजनिक खेळमैदान अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत

30

कुरखेड्याचे एकमेव सार्वजनिक खेळमैदान अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत
– शहर विचार मंचाची नगरपंचायतीकडे सोयी-सुविधांची मागणी
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २७ : शहराच्या उत्तर दिशेला जुनी पटाची दान परिसरात असलेले कुरखेड्याचे एकमेव सार्वजनिक खेळमैदान आजही मूलभूत सोयी-सुविधांअभावी उपेक्षित अवस्थेत आहे. या मैदानावर दररोज सकाळी व संध्याकाळी मोठ्या संख्येने खेळाडू, मॉर्निंग वॉक व इव्हनिंग वॉक करणारे नागरिक तसेच पोलीस व सैन्य भरतीची तयारी करणारे युवक येत असतात. मात्र आवश्यक सुविधा नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मैदानावर एका बाजूला ओपन जिम उभारण्यात आले असले, तरी आवश्यक व्यायाम साहित्याचा अभाव असून काही साहित्य मोडकळीस आलेले आहे. परिणामी व्यायाम करणाऱ्या युवकांना अपूर्ण साधनांवरच सराव करावा लागत आहे. तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मैदान परिसरात बसण्यासाठी पुरेशा बाकांचा अभाव, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे, तसेच ओपन जिम परिसर समतल नसल्याने अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शहर विचार मंचाच्या वतीने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने विकासात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात अद्ययावत व दर्जेदार व्यायाम साहित्य उपलब्ध करून देणे, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालयांचे बांधकाम, नागरिकांसाठी पुरेशा बाकांची व्यवस्था, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच ओपन जिम परिसरात गट्टू बसवून जागा समतल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदासजी निरंकारी, माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, प्रा. डॉ. दशरथ आदे, राम लांजेवार, माजी नगरपंचायत सभापती पुंडलिक देशमुख, नगरसेवक सागर निरंकारी, अॅड. उमेश वालदे, सिराज पठाण, पुष्पराज रहागंडाले, प्रा. किशोर खोपे, राजेश उईके, प्रा. विनोद नागपूरकर, आसिफ शेख, जावेद शेख यांच्यासह शहर विचार मंचाचे सदस्य उपस्थित होते.
शहराच्या आरोग्यदायी वातावरणासाठी व युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या एकमेव सार्वजनिक खेळमैदानाचा तातडीने विकास करावा, अशी ठाम मागणी यावेळी व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here