– कुलगुरूंना दिले तक्रारीचे निवेदन
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा(चेतन गहाणे), दि. २५ : उन्हाळी २०२५ परीक्षेची फी वेळेत भरल्यानंतरही केवळ शिकवणी वर्ग व असायनमेंटचे पैसे न दिल्यामुळे महाविद्यालयीन प्रशासनाने एका होतकरू विद्यार्थ्याला हॉलतिकिट नाकारले. या प्रकारामुळे कुरखेडा तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, अन्यायग्रस्त विद्यार्थ्याने थेट गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना न्यायासाठी धाव घेतली आहे.
मालेवाडा येथील चक्रपाणी धनंजय पेंदाम हा ॲड. विठ्ठलराव बनपूरक मेमोरियल महाविद्यालयात एम.ए. भाग 2 समाजशास्त्र विभागात शिक्षण घेत आहे. त्याने परीक्षेची अधिकृत फी नियमानुसार भरली होती. मात्र, प्रवेश तिकीट घेण्यासाठी गेला असता वरिष्ठ लिपिक हिरामण उईके यांनी शिकवणी व असायनमेंट शुल्काच्या 5,500 रुपयांच्या भरपाईशिवाय हॉलतिकिट देण्यास स्पष्ट नकार दिला.
आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने काही दिवसात पैसे भरण्याची विनंती करूनही विद्यार्थ्याची दाद घेण्यात आली नाही. त्यामुळे चक्रपाणीला परीक्षा देता आली नाही व त्याचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी व मला न्याय द्यावा, अशी मागणी चक्रपाणी पेंदाम याने विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात केली आहे.
विद्यार्थ्यांचे अशा प्रकारे शैक्षणिक नुकसान होणे गंभीर असून, संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई होण्याची मागणी होत आहे.
