कुरखेडा : सती नदीतून रात्रीस ‘खेळ’ चाले, एकलव्य शाळेच्या बांधकामात अवैध वाळूचा वापर
– महसूलाला लाखोंचा फटका
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा (चेतन गहाणे), दि. ०३ : कुरखेडा–वडसा मार्गावरील गुरनोली फाट्याजवळ उभारण्यात येत असलेल्या एकलव्य आदर्श निवासी शाळेच्या बांधकामात अवैध वाळूचा खुलेआम वापर होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सती नदीतून रात्रीच्या अंधारात वाळू उपसून ती ट्रॅक्टर व हायवा मार्फत बांधकाम स्थळी पुरवली जात असून, महसूल विभागाला दररोज लाखोंचा तोटा सहन करावा लागत आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या व विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आठ–दहा दिवसांपासून दररोज रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सती नदीकाठावर अवैध उत्खननाचा ‘खेळ’ सुरू असतो. ४० ते ५० ट्रिप वाळू बांधकाम स्थळी उतरवली जाते आणि दिवसाढवळ्या काँक्रीट मिक्सरमध्ये वापरली जाते. कोट्यवधींच्या शासकीय प्रकल्पात असा निर्भयपणे अवैध वाळूचा वापर होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ‘रात्री नदीकाठावर ट्रॅक्टर-हायव्यांची लगबग असते. रेती लुटली जाते आणि कारवाईला मात्र कोणीच धजावत नाही. अशा प्रमाणातील वाहतूक महसूल आणि पोलिस यंत्रणेच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नाही असे ग्रामस्थ म्हणतात.
सततच्या अवैध खोदकामामुळे सती नदीचे पात्र वेगाने खोलावत असून, परिसरातील विहिरी-बोअर कोरडे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात पाण्याची टंचाई भीषण रूप घेणार, याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांनी कुरखेडा तहसील कार्यालय, जिल्हा खनिज विभाग, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना लेखी तक्रारी सादर केल्या आहेत. काहींनी पुरावे व व्हिडिओंसह ई-मेल आणि व्हॉट्सॲपवरूनही माहिती पाठवली आहे. महसूल विभागाकडून ‘पंचनामा करू’ असे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्ष कारवाई मात्र अद्याप झालेली नाही.
विशेष म्हणजे, अधिकृत रेती घाट सुरू नसतानाही रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असणे, हीच बाब प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण करते.
अवैध वाळूची तात्काळ जप्ती, दोषी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंद, महसूल व पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी आणि सती नदीवरील अवैध उत्खनन थांबवण्यासाठी कायमस्वरूपी पथक नियुक्त करावे अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा हा महत्वाचा प्रकल्प अवैध वाळूमाफियांच्या तावडीतून सुटून रास्त मार्गावर येणार का, हे आता पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
#thegadvishva #thegdv #kurkhedanews #IllegalSandMining #EklavyaSchoolConstruction #KurKheda #Gadchiroli #SandMafia #RevenueLoss #IllegalExcavation #NightOperations #SatiRiver #CorruptionIssue #GovernmentProjectMisuse #BreakingNews














