कुरखेडा : कुंभिटोला प्रकरणी दोषींवर कारवाई होणार, उपोषणकर्त्यांच्या ७ दिवसांच्या लढ्याला यश

826

– उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या दोषींवर कारवाई करण्याच्या लिखित पत्रानंतर उपोषण घेतले मागे
The गडविश्व
कुरखेडा, १९ मार्च : तालुक्यातील कुंभिटोला येथील वीटभट्टी तसेच अवैधरित्या रेती उपसा प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याकरिता १३ मार्च पासून तहसील कार्यलयासमोर उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांच्या लढ्याला तब्बल सात दिवसांनी यश आले असून उपविभागीय अधिकारी, तसेच तहसीलदार यांच्या लिखित स्वरूपात दिलेल्या पत्रातून उपोषण मागे घेण्यात आले आहे. तर सदर प्रकरणात दोषी असलेल्या संबंधितांवर तात्काळ येत्या दोन दिवसात कारवाई केली जाणार असे सुद्धा त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हा सत्याचा विजय असून संबंधित प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार असल्याचे लिखित पत्र असल्याने आम्ही उपोषण मागे घेत असल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे.
कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोला येथील वीटभट्टी प्रकरण तसेच अवैध रेती उपसा प्रकरणी गावकऱ्यांचा विरोध होता. याबाबत गावकऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही केली होती मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे ठोठावुनही काहीही फरक न पडल्याने अखेर उपोषणाचे दरवाजे उघडत तहसील कार्यालय कुरखेडा समोर सोमवार १३ मार्च पासून कुंभिटोला येथील चेतन गहाणे व राजू मडावी हे उपोषणाला बसले. या दरम्यान अधिकारी वर्गाकडून उपोषण मागे घेण्याची विनवणीही करण्यात आली मात्र उपोषणकर्त्यांनी मागे न हटता उपोषण सुरू ठेवले व जोपर्यंत कारवाई होणार नाही अथवा लिखित स्वरूपात कारवाई करण्याची हमी देत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे ठाम होते.
दरम्यान या उपोषणाच्या सात दिवसाच्या कालावधीत चेतन गहाणे यांना धमक्याही आल्यात, महिला तलाठीमार्फतही धमकी आली त्याबाबत चेतन गहाणे यांनी कुरखेडा पोलिसात तक्रार दाखल केली. आलेल्या धमक्यांना न जुमानता उपोषण सुरू ठेवले यावेळी उपोषणकर्ते राजू मडावी यांची प्रकृती खालावली त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले व पुन्हा उपोषणस्थळी दाखल झाले. उपोषणाच्या या ७ दिवसाच्या कालावधीत अनेकांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला, तर आज १९ मार्च रोजी आमदार कृष्णा गजबे यांनी सुद्धा भेट दिली. तसेच कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी सुद्धा उपोषणस्थळी भेट देऊन सदर प्रकरणातील दोषींवर उचित कारवाई करण्यात येईल असे लिखित स्वरूपात पत्र देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले असता उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
आता या प्रकरणी काय कारवाई होते याकडे तालुकासह जिल्हावासीयांचे लक्ष लागले असून या प्रकरणात अनेक मासे गळाला लागण्याची सुद्धा शक्यता वर्तविली जात आहे.

हा सत्याचा विजय असून संबंधित प्रकरणात दोषींवर कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणास बसू, अधिकाऱ्यांनी उचित कारवाई करून न्याय द्यावा त्यामुळे पुढे कोणीही असल्याप्रकारे कार्य करणार नाहीत.

– चेतन गहाणे
उपोषणकर्ते

तब्बल सात दिवसानंतर संबंधित अधिकारी यांनी आम्हाला लिखित स्वरूपात कारवाई करण्याची हमी दिल्याने हे उपोषण मागे घेत आहोत, मात्र कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणाला बसू.

-राजू मडावी
उपोषणकर्ते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here