– आमदार गजबेंच्या हस्ते नुकसानग्रस्तांना देण्यात येणार नुकसान भरपाई
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, ५ ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यात वडसा वन विभागा अंतग॔त येत असलेल्या कुरखेडा तालुक्यातील अनेक गावांत छत्तीसगड राज्यातुन स्थलांतरित झालेल्या जंगली हत्तींनी धुमाकुळ घालुन शेतपिकाचे,शेती अवजारांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. त्यानुसार झालेल्या नुकसानीचा पंचनामा शासनाला सादर करण्यात आला असून त्या अनुषंगाने वनहत्तींमुळे झालेल्या नुकसानीचे अर्थसहाय्य वितरीत करण्यासाठी राज्याचे वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबेंना प्राधिकृत केले असून ५ ऑगस्ट २०२३ रोजी नुकसानग्रस्तांना धनादेश वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती पुराडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. एच. डिगोळे यांनी दिली आहे.
२ ऑगस्ट रोजी आंबेझरी येथे रानटी हत्तींच्या कळपाने १४ घरांचे नुकसान केले. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पुराडाचे ( (प्रा.)) वनपरिक्षेत्र अधिकारी बी. एच. डिगोळे, रामगडचे क्षेत्र सहाय्यक एस. एल. कंकलवार, वनरक्षक सुरेश रामटेके, कनिष्ठ अभियंता मेश्राम, पुराडा तलाठी साजा रामटेके यांच्या समितीने पंचनामे नोंदवून उपविभागीय वन अधिकारी कुरखेडा स्थित वडसा यांना चौकशी अहवाल सादर करण्यात आला. दरम्यान ४ ऑगस्ट रोजी
एम. एन. चव्हान उपविभागीय वन अधिकारी कुरखेडा स्थित वडसा यांनी १३ नुकसान ग्रस्तांना प्रत्येकी ५० हजार रुपये प्रमाणे तसेच, एका नुकसान ग्रस्तास ४५ हजार रुपये असे एकंदर नुकसान भरपाई रक्कम ६ लाख ९५ हजार रुपये मंजुर केली व धर्मवीर सालविठ्ठल उपवनसंरक्षक, वडसा वनविभाग, वडसा यांनी ४ ऑगस्ट रोजी नुकसान भरपाईची संपुर्ण रक्कम वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.), पुराडा यांना वाटपाकरीता वितरीत केली तसेच, वनविभागाव्दारे नुकसान ग्रस्तांना ताडपत्री व रेशन किटचे सुध्दा वाटप केले.
यावर्षी २०२३-२४ मध्ये २१ जुलै २०२३ रोजी अंदाजे २२-२३ जंगली हत्तींचा कळप गोंदिया जिल्ह्यातील गोठणगाव मार्गे कुरखेडा परिक्षेञातील चारभट्टी,पिंटेसुर बिटामध्ये दाखल झाले होते. सदर क्षेत्रात रानटी हत्तींनी अंदाजी ३० शेतकऱ्यांच्या शेतीची नुकसान केली त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मोका पंचनामा करून शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई देण्याची कारवाई करण्यात आली असतानाच सदर कळपाने २२ जुलै २०२३ रोजी पुराडा वन परिक्षेत्रातील उपक्षेत्र हिडिकीकन्हार गावात दाखल होऊन २५ जुलै पर्यंत व त्यानंतर २६ जुलै पासुन ३१ जुलै पर्यंत पुराडा परिक्षेत्रातील कोहका,दादापुर परिक्षेत्रात वास्तव्यास राहुन १ ऑगस्ट २०२३ रोजी आंबेझरी गावातील १४ घरांचे नुकसान केले आहे.
सदर जंगली हत्तीच्या कळपाने २ ऑगस्ट २०२३ रोजी पुराडा परिक्षेत्रातुन सोनसरी मार्गे देलनवाडी परिक्षेत्रातील चिचेवाडा बिटातिल चांदोना गावातील ८ शेतकऱ्यांच्या शेतीची नुकसान केली असून उपरोक्त वन परिक्षेञातील वनाधिकाऱ्यांनी झालेल्या नुकसानीची मोका चौकशी करून नुकसानीचे पंचनामे शासनाला सादर केले आहेत.
त्या अनुषंगाने पुराडा परिक्षेत्रातील १४ घरांच्या नुकसानीचे ६ लाख ९५ हजार, १३० शेतकऱ्यांच्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी १८.२० लक्ष, कुरखेडा परिक्षेत्रातील ३० शेतकऱ्यांच्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी ४.२० लक्ष तसेच देलनवाडी परिक्षेत्रातील ८ शेतकऱ्यांच्या शेतपिक नुकसानीपोटी १.१२ लक्ष असा एकुण १८२ नुकसानग्रस्तांना ३०.५२ लक्ष रुपयाचा निधी आमदार गजबे यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी यांनी आमदार कृष्णा गजबेंना प्राधिकृत केले असून नुकसान भरपाई ५ ऑगस्ट २०२३ रोजी वितरीत करण्यात येणार आहे.