कुरखेडा : अवैध गौण खनिज प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

588

– कुंभिटोला वासीयांचे उपोषण मागे, कोणावर काय कारवाई ?
The गडविश्व
गडचिरोली, १३ एप्रिल : जिल्ह्यात अवैध गौण खनिजांची छुप्या मार्गाने लूट होत असताना याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. असे असतांना कुंभिटोला येथील अवैध माती उत्खनन करून शासनाच्या नियमाना बगल देत अवैधरित्या वीटभट्टी चालवणे, तसेच अवैध रेती उपसा प्रकरणी कुंभिटोला येथील गावकऱ्यांनी उपोषणाचे शस्त्र उगारून अखेर प्रशासनाला दखल घेण्यास भाग पाडले व प्रशासनाच्या लेखी अश्वासनाने उपोषण मागे घेतले असून या प्रकरणी अनेक मासे गळाला लागणार असून या प्रकरणी अनेक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार उभी आहे. त्यामुळे आता कोणावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
प्राप्त महितीनुसार, कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोला येथे अवैधरित्या माती उत्खनन करून शासनाच्या नियमांना बगल देत वीटभट्टी सुरू असल्याने व याचा त्रास नागरिकांना होत असल्याने आरोग्य धोक्यात येत होते, तसेच येथील रेती घाटावरही अवैध रेती उपसा होत असल्याने या दोन्ही प्रकरणी स्थानिक प्रशासनाला गावकऱ्यांनी निवेदनातून संबंधितांवर कारवाई करण्याकरिता मागणी केली होती. मात्र स्थानिक प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याने सदर अवैध रेती उपसा प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री सचिवालयामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली मात्र त्यावरही काही कारवाई न झाल्याने अखेर कुंभिटोला येथील गावकरी चेतन गहाणे राजू मडावी हे तहसील कार्यालय कुरखेडा समोर संबंधितांवर कारवाई करण्यासाठी उपोषणाला बसले. या दरम्यान उपोषणकर्त्यांना धमक्याही आल्या, खुद्द महिला तलाठीनेही माझ्यावर निलंबनाची कारवाई झाल्यास तुमच्या घरी आत्महत्या करेल, तुमची वाट लावणार अश्याप्रकारे धमकी दिली. तर महसूल विभागाने या प्रकरणाची झळ आपल्यापर्यंत येऊन आपल्यावरही कारवाई होईल या भीतीने मुदातबाह्य जाहीरनामा ग्रामपंचायत स्तरावर लावण्याचा केविलवाणा प्रकार केला जो सामान्य व्यक्तीच्याही लक्षात आलं की आपली बाजू संभाळण्यासाठी हा सर्व प्रकार होतोय. उपोषण मागे घेण्यासही अनेकदा विनंती करण्यात आली मात्र जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही यावर उपोषणकर्ते ठाम होते. दरम्यान यातील राजू मडावी यांची प्रकृती खालावली होती व एक दिवस उपचार करून पुन्हा ते उपोषणस्थळी दाखल झाले. त्यानंतर आमदार गजभे यांनी उपोषणाची दखल घेत उपोषणस्थळी भेट दिली व उपोषणकर्त्यांची मागणी रास्त असून त्याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी केली असता तहसीलदार, उपविभागीय अधिकारी लागलीच उपोषण स्थळी भेट देत दोन दिवसात संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
मात्र उपोषण सुटून अनेक दिवसांचा कलावधी लोटूनही दोषींवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता पुन्हा याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत गेली असल्याने प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहे. त्यामुळे ते अधिकारी कोणते ? कोणत्या अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार आहे ? याबाबत सर्वांचे लक्ष लागले असून संबंधित प्रकरणात कोण कोण दोषी आहेत आणि काय कारवाई होणार हे पुढील भागात… क्रमशः

(The gdv) (the gadvishva) (kurkheda)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here