चतुर्थ श्रेणी दर्जा न मिळाल्यास १२ सप्टेंबरपासून कोतवालांचे बेमुदत धरणे आंदोलन

58

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०९ : महसूल सेवक (कोतवाल) यांना शासनाने अद्याप चतुर्थ श्रेणी दर्जा मंजूर केला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत असून ११ सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास १२ सप्टेंबरपासून महसूल मंत्री यांच्या कार्यक्षेत्रातच बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा विदर्भ महसूल सेवक संघटना तालुका शाखा कुरखेडा यांनी दिला आहे. महसूल सेवक हे महसूल यंत्रणेचा कणा असून २४ तास शासकीय सेवा बजावत असतात. महसुली कामकाजाबरोबरच निवडणुका, जनगणना, प्रमाणपत्र वितरण, आपत्ती व्यवस्थापन, टंचाई, मोहिमा अशा अनेक बिगर महसुली जबाबदाऱ्या ते पार पाडतात. तरीदेखील शासन सेवकांच्या गटातील मान्यता व सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या गेलेल्या नाहीत. यामुळे दीर्घकाळापासून अन्याय सहन करावा लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
या मागणीसाठी संघटनेने ३ सप्टेंबर रोजी शासनाला निवेदन दिले होते, मात्र अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे संताप वाढला असून संघटनेने १० सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून कामकाज करणे, ११ सप्टेंबर रोजी तालुका स्तरावर लक्षवेधी धरणे आंदोलन करणे आणि १२ सप्टेंबरपासून महसूल मंत्री यांच्या कार्यक्षेत्रातील कोराडी क्रीडा संकुलाच्या आवारात बेमुदत धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाची माहिती जिल्हाधिकारी गडचिरोली, उपविभागीय अधिकारी कुरखेडा आणि विदर्भ पटवारी संघाला देण्यात आली आहे. शासनाने तातडीने कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन न्याय द्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा महसूल सेवक संघटनेने दिला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here