The गडविश्व
ता.प्र / कोरची, दि. २६ : कोरची–कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी मध्यरात्रीपासून तब्बल १२ तास वाहतूक ठप्प झाली होती. घाटातील अरुंद वळणावर एक ट्रक नादुरुस्त झाल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. या भीषण जाममध्ये अनेक प्रवाशांना अडकून राहावे लागले, ज्यात एक गरोदर महिला व लहान मुलेही होती. पिण्याच्या पाण्याशिवाय व अन्नाविना अनेकांना रात्र काढावी लागली.
रात्री २ वाजण्याच्या सुमारास छत्तीसगडहून बेंगळुरूकडे निघालेला ट्रक कोरची-कुरखेडा घाटात नादुरुस्त झाल्यामुळे महामार्गावर एकामागून एक वाहने अडकत गेली. सुमारे ५ ते ६ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या मार्गावर नेहमीच हलक्या व जड वाहनांची वर्दळ असते. मात्र, अरुंद रस्ता आणि अकार्यक्षम वाहतूक व्यवस्थापनामुळे अपघात व वाहतूक कोंडी ही नेहमीचीच बाब झाली आहे.

कोंडीत अडकलेल्या प्रवाशांमध्ये एका शासकीय बसमधील ४० प्रवासी, गरोदर महिला आणि लहान मुले यांचा समावेश होता. पाच तासांपर्यंत तेथेच अडकून राहावे लागल्यामुळे त्यांचे हाल झाले. विशेष म्हणजे, ही परिस्थिती नियंत्रीत करण्यासाठी कोणताही शासकीय कर्मचारी किंवा यंत्रणा घटनास्थळी हजर झाली नाही. यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, सुरजागड खनिज प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर ट्रक वाहतूक या रस्त्यावरून होते. त्यामुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
या प्रकारामुळे पुन्हा एकदा या रस्त्याच्या अपुऱ्या रूंदी व व्यवस्थापनाच्या ढिसाळपणाचे चित्र समोर आले आहे. नागरिक व प्रवाशांनी आता या मार्गावर कायमस्वरूपी वाहतूक सुधारणा व देखभाल यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे.