कोरची : जि.प. शाळेत भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांचा मद्यधुंद राडा, विद्यार्थ्याला मारहाण व शिक्षकांसोबत अरेरावी
– संतापजनक प्रकाराने कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा- कोरची, दि. ३१ : तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी मद्यधुंद अवस्थेत राडा घातल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे. तर या कर्मचाऱ्यांनी शाळेतील शिक्षकांशी अरेरावीची भाषा वापरत विद्यार्थ्यांनाही मारहाण केल्याने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोरची येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले मुख्यालय सहाय्यक मुकेश वासनिक आणि निमनतदार सुरज खरवडे हे दोघे दुपारी सुमारे २:४५ वाजताच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोरी येथे दाखल झाले. त्यावेळी वर्ग सुरू असताना त्यांनी शिक्षकांशी उर्मटपणे बोलत “आम्ही डेहराडूनहून आलो आहोत” असा गवगवा करत थेट वर्गखोलीत प्रवेश केला.
यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याच्या बहाण्याने दोघांनी गोंधळ सुरू केला. एका विद्यार्थ्याला पाठीवर मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी सांगितले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थी भयभीत झाले. मुख्याध्यापिकांनी तत्काळ गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु संपर्क साधता आला नाही.
सुमारे दीड ते दोन तास हे दोन्ही मद्यधुंद कर्मचारी शाळेच्या आवारात फिरत राहिले, शिवीगाळ केली आणि गोंधळ घालत राहिले. घटनेनंतर पालक आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून, “शाळेत घुसून विद्यार्थ्यांवर हात उगारणाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी,” अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, कोरची, ज्ञानेश्वर शिंदे यांनी सांगितले की, “सदर घटना अत्यंत गंभीर आहे. मी सध्या वैद्यकीय रजेवर आहे. रुजू झाल्यानंतर तात्काळ चौकशी करून संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.”
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Korchi #Gadchiroli #LandRecords #DrunkEmployees #SchoolRuckus #StudentAssault #EducationDepartment #ZPSchoolBori #TheGadVishva #NewsUpdate #गडचिरोली #कोरची #भूमिअभिलेख #शाळेतराडा #विद्यार्थ्यामारहाण #TheGadVishva














