– नक्षलग्रस्त भागातून उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव; धानोरा तालुक्याचा मान वाढवणारा क्षण
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २८ : धानोरा तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी खुशाल नेवारे यांना सन 2022-23 मधील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. नक्षलग्रस्त भागातून येणाऱ्या अधिकाऱ्याला मिळालेला हा सन्मान तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे.
मुंबई येथे 27 मे 2025 रोजी पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, ग्रामविकास मंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नेवारे यांचे सन 2022-23 मध्ये पंचायत प्रशासन, ग्रामविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आणि लोकसहभाग वाढविण्याच्या प्रयत्नांची राज्यस्तरावर दखल घेतली गेली. नागपूर विभागातून आणि गडचिरोली जिल्ह्यातून ही निवड होऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांचा सपरिवार सत्कारही करण्यात आला.
ग्रामविकास मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार, प्रत्येक जिल्ह्यातून एक उत्कृष्ट ग्रामपंचायत अधिकारी निवडण्यात येतो. या निवडीच्या आधारावर नेवारे यांना मंत्री (ग्रामविकास) यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
या उल्लेखनीय सन्मानाबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोलीचे अध्यक्ष शशिकांत साळवे, माजी उपसरपंच नरेंद्र भुरसे, दिवाकर भोयर, नंदू कुनघाडकर, श्रावण देशपांडे, प्रदीप गेडाम आदींनी नेवारे यांचे अभिनंदन केले आहे.
नेवारे यांचा हा सन्मान संपूर्ण तालुक्याला अभिमान वाटावा असा आहे आणि हा आदर्श निश्चितच इतर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल.
