– शहर विचार मंचाची खासदारांकडे मागणी
The गडविश्व
कुरखेडा, दि. १५ : जबलपूर-चांदाफोर्ट ही सुपरफास्ट ट्रेन आठवड्यातून तीन दिवस वडसा (देसाईगंज) मार्गे धावत असूनही वडसा येथे तिचा थांबा नाही, यामुळे स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर वडसा येथे या ट्रेनचा थांबा द्यावा, अशी मागणी शहर विचार मंच, कुरखेडा यांच्या वतीने खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
१३ जून रोजी सायंकाळी ६ वाजता कूरखेडा येथील विश्रामगृहात झालेल्या भेटीत मंचाच्या प्रतिनिधींनी सदर निवेदन खासदारांना दिले. जबलपूर-चांदाफोर्ट ट्रेन मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार या तीन दिवशी नैनपूर, बालाघाट, गोंदिया, नागभीड मार्गे चांदाफोर्टकडे जाते. मात्र, या मार्गावरील वडसा – देसाईगंज या जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानकावर तिचा थांबा नसल्याने या भागातील नागरिक व व्यापाऱ्यांना गोंदिया व मध्यप्रदेशाशी थेट संपर्कासाठी अडचणींचा सामना करावा लागतो.
वडसा ही जिल्ह्याची महत्त्वाची व्यापारी व दळणवळणाची केंद्रबिंदू नगरी असून येथे सुपरफास्ट ट्रेनचा थांबा मिळाल्यास संपूर्ण परिसरातील नागरिकांना फायदा होईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या मागणीसाठी पाठपुरावा करण्याची विनंती खासदारांना करण्यात आली. निवेदन देताना शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी, उपाध्यक्ष आशाताई तुलावी, प्रा. किशोर खोपे, जीवन पाटील नाट, मधुकर बोबाटे, डॉ. जगदीश बोरकर, राजेश उईके, रोहित ढवळे, आसिफ शेख, सिराज पठाण, प्रा. विनोद नागपूरकर, सागर निरंकारी, पुष्पराज रहांगडाले, विवेक निरंकारी व मंचाचे इतर सदस्य उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolipolice #kurkhedanews #wadsa)