या’ सण, उत्सवाच्या दिवशी ध्वनीक्षेपक व वाद्य वाजविण्यास परवानगी

161

– सकाळी ०६ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत सुट
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : शासन निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियत २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिप्पणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी, जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये १५ दिवस निश्चित करुन सकाळी ०६ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत सुट जाहिर करण्याकरीता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाद्वारे प्राधिकृत केलेले आहे. जिल्हाधिकारी यांनी संबंधित ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याशी सल्लामसलत करुन १५ दिवस जाहिर करण्याचे निर्देश आहेत.
पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांचे पत्रानुसार चालु वर्षात पुढीलप्रमाणे दिवस निश्चित करुन सण, उत्सवाच्या दिवशी ध्वनीक्षेपक व वाद्य वाजविण्याची परवानगी सकाळी ०६.०० वा. ते रात्रो १२.०० वा. पावेतो निर्धारीत करुन आदेश निर्गमित होणेस विनंती केलेली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती- १ दिवस (दिनांक १९.०२.२०२४), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती- १ दिवस (दिनांक १४.०४.२०२४), ०१ मे, महाराष्ट्र दिन १ दिवस, गणपती उत्सव ३ दिवस (पाचवा, सातवा व अनंत चतुर्थदशी), ईद ए मिलाद- १ दिवस (दिनांक १६.०९.२०२४), नवरात्री उत्सव / विजयादशमी – ३ दिवस (दि.११, १२ व १३ ऑक्टोबर २०२४), दिवाळी- १ दिवस (लक्ष्मीपूजन दिनांक ०१.११.२०२४), ख्रिसमस – १ दिवस (दिनांक २५.१२.२०२४), ३१ डिसेंबर १ दिवस (दिनांक ३१.१२.२०२४).

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली सन २०२४ या वर्षामध्ये वरीलप्रमाणे १३ दिवस ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिप्पणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी सकाळी ०६.०० वाजल्यापासून ते रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर पुढील अटी व शर्तीच्या अधिन राहून या आदेशाद्वारे घोषित करीत आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० व ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरण यांचे तंतोतंत पालन करावे. जनहित याचिका क्र.१७३/२०१० मध्ये मा. उच्च न्यायालयाने दिनांक १६ ऑगस्ट २०१६ रोजी दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्यात यावे. उपरोक्त अधिसूचनेत घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतूदींचे उल्लंघन होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना संबंधित विभागाने कराव्या. ही सुट राज्य शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्रात लागू नाही. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here