अहेरीत १०० खाटांचे महिला-बाल रुग्णालय उद्घाटन ; सिरोंचात रुबी हॉस्पिटल प्रकल्पाचे भूमिपूजन
– औद्योगिकतेसोबत आरोग्य क्षेत्रातही गडचिरोलीची ऐतिहासिक झेप
The गडविश्व
गडचिरोली, दि. ८ : “औद्योगिक प्रगतीसोबत गडचिरोली आता आरोग्य क्षेत्रातही झेप घेत आहे. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता दक्षिण गडचिरोलीत उपलब्ध होणार आहेत. हा दिवस गडचिरोलीच्या ‘आरोग्य क्रांती’चा दिवस म्हणून ओळखला जाईल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
अहेरी येथे १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण आणि सिरोंचा येथे रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रा. लि. च्या अत्याधुनिक ३५० खाटांच्या हॉस्पिटल व कॉलेज कॅम्पस प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.
या वेळी राज्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बीदरी, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके आणि आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, “अहेरीचे हे आधुनिक रुग्णालय खाजगी रुग्णालयांनाही लाजवेल इतके सुसज्ज असून, मातृत्व, बाल आरोग्य आणि कुपोषणावरील उपचार यासाठी सर्व अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत. भामरागड तालुक्यातील कोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत, जरावंडी व ताडगाव केंद्रांचे श्रेणीवर्धन, वेंगनुर उपकेंद्र आणि रेगडी आरोग्य केंद्र यांचे लोकार्पण, तसेच जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील नवीन सार्वजनिक आरोग्य पथकांचे उद्घाटन आज करण्यात आले.”
त्याचप्रमाणे सिरोंच्यातील रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रा. लि. प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “रुबी हॉस्पिटल हे जागतिक स्तरावरील आरोग्य सेवेसाठी प्रसिद्ध आहे. आता त्याच दर्जाची सुविधा गडचिरोलीत उपलब्ध होणार आहे. यामुळे रुग्णांना नागपूर, पुणे किंवा मुंबई गाठण्याची गरज उरणार नाही. महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगडातील रुग्णांनाही या सेवेचा लाभ मिळेल.”
या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत २४०० आजारांवर मोफत उपचार मिळणार असून, वैद्यकीय व नर्सिंग कॉलेज सुरू होणार असल्याने स्थानिक युवक-युवतींना रोजगार आणि प्रशिक्षणाच्या संधी निर्माण होतील.
औद्योगिक विकासावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “लोह प्रकल्पांमुळे गडचिरोली ‘देशाचा स्टील हब’ बनत आहे, मात्र याचबरोबर गडचिरोलीला ‘ग्रीन हब’ बनवण्याचाही आमचा संकल्प आहे. पाच कोटी झाडांच्या लागवडीचा निर्णय घेतला असून, ५०० कोटी रुपयांचे रस्ते व पूल बांधकाम मंजूर झाले आहे.”
यावेळी महिलांसाठी राखीव निधीतून तीन कोटी रुपयांचा फिरता निधी मंजूर करण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहेरीतील बिरसामुंडा व राजाराम महिला बचत गटांना प्रतीकात्मक धनादेश वितरित करण्यात आला.
गडचिरोलीच्या विकासासाठी उद्योग-आरोग्य-महिला सक्षमीकरणाचे त्रीसूत्र : सहपालकमंत्री आशिष जयस्वाल
सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यात विकासाची गती वाढली आहे. मागील अर्थसंकल्पात गडचिरोलीसाठी ५०० कोटींचा निधी मंजूर झाला असून, जिल्ह्याचा समावेश राज्यातील पहिल्या दहा प्रगत जिल्ह्यांत व्हावा, यासाठी उद्योग, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या त्रीसूत्रीवर विकास आराखडा राबवला जात आहे.”
महिलांसाठी राखीव निधीतून तीन कोटी रुपयांचा फिरता निधी मंजूर करून प्रत्येक बचत गटाला एक लाख रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. “गडचिरोलीत यशस्वी ठरलेले हे मॉडेल संपूर्ण राज्यात राबवले जाणार आहे,” असे जयस्वाल यांनी सांगितले.
या प्रसंगी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मुख्यमंत्र्यांकडे अहेरी तालुक्याच्या विकासासाठी विविध मागण्या मांडल्या. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाला विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews














