मिशन इंद्रधनुष 5.0 मोहिमेच्या माध्यमातून माता व बालकांचे लसीकरण

99

– गोडलवाही येथे मोहिमेचा शुभारंभ
The गडविश्व
गडचिरोली, ०८ ऑगस्ट : बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी बालकांचे व त्यांच्या मातांचे संपूर्ण लसीकरण करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे नियमित लसीकरणापासून सुटलेले बालके व गरोदर माता यांचे संपूर्ण लसीकरण करुन त्यांना संरक्षित करण्याच्या दृष्टीने केंद्रशासन स्तरावरुन प्राप्त सुचनांनुसार सन 2023-24 या वर्षात 3 टप्प्यामध्ये विशेष मिशन इंद्रधनुष 5.0 मोहिम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेचा पहिला टप्पा आरोग्य विभागाच्या वतीने 7 ते 12 ऑगस्ट 2023 दरम्यान राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्याच्या शुभारंभ 7 ऑगस्ट 2023 रोजी प्राथमिक आरोग्य, केंद्र, गोडलवाही, ता.धानोरा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली आयुषी सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.स्वप्निल बेले, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल मडावी, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. विनोद मशाखेत्री, तालुका आरोग्य अधिकारी, धानोरा, डॉ. सखराम हिचामी, वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ. केंद्र, गोडलवाही, डॉ. उपलेंचवार, डॉ. कुणाल मोडक व जिल्हास्तरीय व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी प्रास्ताविक करतांना नियमित लसीकरणाचे महत्व पटवून दिले. शुभारंभ प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुषी सिंग, यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील पात्र बालके व गरोदर माता हया या मोहिमेमधून सुटणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे सामान्य जनतेने विशेष मिशन इंद्रधनुष 5.0 हया मोहिमेचा लाभ घेऊन बालके व गरोदर माता यांना सुरक्षित करण्याचे आवाहन केले. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here