– जय पेरसापेन हायस्कूल, माळंदा येथे सायकलवाटप
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०२ : धानोरा तालुक्यातील माळंदा येथील जय पेरसापेन हायस्कूलमध्ये मानव विकास मिशन अंतर्गत दहावीतील 10 विद्यार्थिनींना सायकली वाटप करण्यात आल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणाला चालना देणारा आणि प्रवासातील अडथळे दूर करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक ए. एन. बढई होते. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य अमरूजी बढाई, कृष्णा भुरकुरिया, रामचंद्र बढाई, सौ. आशाताई पदा, राजाराम मडावी, निरंगशाहजी पदा, कुल्लेजी नैताम, सौ. सुरगोबाई गावडे, सौ. कविताताई गावडे आणि सौ. ललिताताई हलामी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणात नियमितता, वेळेचे नियोजन आणि स्वावलंबन वाढण्यास मदत होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास शाळेतील शिक्षक शेख, धुडसे, गदेवार तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मारकवार, ठमके व संतोषवार यांची उपस्थिती होती. हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी शिक्षणाच्या दिशेने उचललेले सकारात्मक पाऊल ठरले आहे.
