मालेवाडा-धनेगाव मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, बाप-लेक गंभीर
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. ०२ : मालेवाडा-धनेगाव मार्गावर सोमवारी दुपारी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या दुचाकीवरील पिता-पुत्री गंभीर जखमी झाले. ही घटना दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
फाल्गून ऋषी गुरनुले (४४, रा. धनेगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर किशोर छगन नैताम (३५) आणि त्यांची मुलगी भाग्यश्री किशोर नैताम अशी जखमींची नावे आहेत. एमएच ३३ एएफ ३०५० आणि एमएच ३५ एएम ०८८६ क्रमांकाच्या दुचाकींमध्ये ही धडक झाली.
अपघातानंतर जखमींना तातडीने कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पिता-पुत्रीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच मालेवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालेवाडा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews













